नागपूर: वीज दरवाढ व स्मार्ट प्रीपेड मीटरविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृह शहर असलेल्या नागपुरात थेट महावितरण कार्यालयात देयकाची होळी केली गेली. या घटनेबाबत आपण जाणून घेऊ या.
महावितरण कार्यालय परिसरात वीज बिल होळी केल्याने विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. महावितरणने १ ऑक्टोबर २०२५ ला प्रति युनिट ३५ पैसे ते ९५ पैसे दराने वीजेच्या बिलात दरवाढ केली. दिवाळी सारख्या आनंदाच्या सणात महावितरण कंपनी ने जनतेला करंट लावण्याचे महापाप केले. वरून टीओडी मीटरच्या नावाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर लावून जनतेला लुटण्याचे कट कारस्थान केले जात आहे.
या मीटर आणि वीज दरवाढी विरोधात विराआस नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे यांच्या नेतृत्वात महाल परिसरातील शिवाजी नगर गेट ते तुळशीबाग महावितरण कार्यालय पर्यंत, वीज दरवाढ व स्मार्ट प्रीपेड वीज मीटर रद्द करा या मागणीला घेऊन वीज मार्च काढण्यात आला. आंदोलकांना बघून तुळशीबाग येथील महावितरण कार्यालयाचे मुख्य गेट बंद करण्यात आले. यावेळी विराआस कार्यकर्ते आक्रमक घोषणा देत गेट ला पुढे ढकलत अधिकाऱ्याला भेटण्या करता पुढे सरसवले.
येथे अधिकारी अनुपस्थित असल्यामुळे कार्यकर्ते आक्रमक झाले व अधिकाऱ्याला बोलवून आना असा चंग बांधला. त्यानंतर परिसरात घुसून सामूहिक वीज बिलाची होळी करण्यात आली. त्यामुळे युवा आघाडी अध्यक्ष मुकेश मासुरकर व नागपूर शहर अध्यक्ष नरेश निमजे दोघांना पोलिसांनी डिटेन केले व कोतवाली पोलीस ठाणे येथे नेऊन त्यांच्यावर कार्यवाही केली. नेलेल्या कार्यकर्त्यांना जोपर्यन्त सोडत नाही तोपर्यंत बाकी कार्यकर्त्यांनी अरुण केदार व ज्योती खांडेकर यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयाला घेरून ठेवले शेवटी अर्ध्यातासातच सुटका केली, त्यामुळे कार्यकर्ते नरमावले व वीज मार्च ची सांगता केली.
आंदोलकांचे म्हणणे काय ?
वीज विदर्भात तयार होते, ती गोव्या पर्यंत वाहूननेली जाते, त्याकरता जमीन, पाणी, कोळसा व इतर संसाधने विदर्भाच्या जनतेचीच वापरली जाते, व महाग विजेचा भुर्दंड ही विदर्भाच्या जनतेला मिळतो हा कुठला न्याय ? व स्मार्ट प्रीपेड मीटरला विराआस चा विरोध असतानाही लावणे हे अन्याय कारक आहे. जेव्हा की विधानसभा निवडणुकी अगोदर विराआस कार्यकर्त्यांनी बावनकुळे यांना जोडा फेकून मारल्यामुळे त्यांनी आंदोलन स्थळी येऊन प्रीपेड मीटर रद्द करू अशी घोषणा केली होती. व त्याची अंमलबजावणी करीत महावितरण कंपनी ने प्रीपेड मीटर लावणे थांबविले होते, परंतु विधानसभा निवडणुकीत बहुमतात निवडून येताच उद्योगपतीच्या ईशाऱ्यावर पुन्हा गुपचूप पणे स्मार्ट मीटर लावले जात आहे. आम्हाला पुन्हा ऊर्जामंत्र्याला जोडा मारावा लागेल ? असे आंदोलक म्हणाले.