नागपूर : झाडावर चढून आंबे तोडताना विजेच्या तारेचा धक्का लागल्याने एका इसमाचा मृत्यू झाला. सोनेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कुर्वेनगर या भागात ही घटना घडली.
सुर्वेनगरमधील रहिवासी मून यांच्या घरी आंब्याचे झाड आहे. तेथे बागकाम करणारे राम वासुदेव साठवणे (४१, रा. इसासनी) हे बागकाम करताना आंब्याच्या झाडावर चढले व आंबे तोडू लागले हे करताना त्यांचा स्पर्श जिवंत विद्युत प्रवाहित तारेला झाला. विजेचा धक्का बसताच ते खाली पडले व बेशुद्ध झाले. त्यांना तातडीने एम्समध्ये नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
युवकाच्या डोक्यावर लोखंडी सळईने वार केल्याने एका युवकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवकाच्या मित्राविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विश्वकर्मानगरमधील रहिवासी आर्यन वहिले (१८) हा डेकोरेशनचे काम करीत होता. आठ दिवसांपासून तो घरी परतला नाही. १० जूनला तो एका रस्त्यावर पडलेला आढळला. त्याला त्याच्या वडिलाने घरी आणले. त्याला नारळ पाणी पिण्यासाठी देण्यात आले. त्यानंतर तो झोपी गेला. रात्री ९ वाजता त्याच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला. त्याला मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आर्यनचे वडील विला वहिले यांनी याप्रकरणी अजनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. आर्यनच्या शवाचे विच्छेदन करण्यात आल्यावर त्याच्या डोक्याला गंभीर जखम आढळून आली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला.