लग्नसमारंभात ओळख झाल्यानंतर प्रेमजाळ्यात अडकलेल्या १६ वर्षीय मुलीवर युवकाने बलात्कार केला. त्यातून तिला गर्भधारणा झाली. नुकताच तिने गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र, युवकाने आता लग्नास नकार दिला. या प्रकरणी अल्पवयीन प्रेयसीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल ससाने (वय २४) याचा वाडी येथे कॅटरिंगचा व्यवसाय आहे. १६ वर्षीय पीडिता आणि आरोपी एकाच परिसरात राहतात. गेल्या वर्षी मुलीच्या घराशेजारी झालेल्या विवाह सोहळ्यातील कॅटरिंगचे काम आरोपी अमोलला मिळाले होते. याच सोहळ्यात अमोल आणि मुलीची भेट झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. त्यानंतर अमोलने मुलीला अनेक ठिकाणी नेऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. गेल्या दोन वर्षांपासून तो मुलीचे लैंगिक शोषण करीत होता. त्यानंतर मुलीने शारीरिक संबंधास नकार देत शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले. त्याने कधी धमकावून तर कधी लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी पुन्हा शरीरसंबंध जोडले. त्यातून तिला गर्भधारणा झाली. घरात कुणालाही सांगत येत नव्हते तर दुसरीकडे प्रियकर दमदाटी करीत होता.

लग्न करण्यास नकार –

मुलीने प्रियकराला ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले. त्यामुळे तो तिच्यावर गर्भपात करण्यासाठी दबाव टाकत होता. तिने लग्न करण्याची गळ घातली असता त्याने तिच्या आई-वडिलांना जीवे मारण्याची तिला धमकी दिली. त्यामुळे मुलगी घाबरली. मुलगी ७ महिन्यांची गर्भवती झाल्यानंतर तिच्या आईने तिला रुग्णालयात नेले.

गर्भपातास परवानगी नाकारली –

डॉक्टरांनी कायद्यानुसार गर्भपात करता येत नसल्याचे सांगितले. त्यामुळे मुलीला बाळाला जन्म देण्यावाचून पर्याय नव्हता. त्यामुळे नाईलाजाने का होईना अल्पवयीन मुलीचे आईवडील हतबल झाले. त्या मुलीने आता नुकताच एका गोंडस बाळाला जन्म दिला. अडचणीत सापडल्यामुळे मुलीने वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी अमोल ससानेवर बलात्काराच गुन्हा दाखल करून अटक केली.