नागपूर : केंद्रिय भू- प्रष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वारंवार खुल्या मंचावरून आरटीओत उघडपणे भ्रष्टाचार होत असल्याचे आरोप केले आहेत. त्यातच नागपुरातील ग्रामीण आरटीओत पाच महिन्यांत लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने चार वेळा सापळे यशस्वी करत भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणला.
अगदी कालच शुक्रवारी १७ ऑक्टोबरला लाचलुचपत विभागाने दोन अधिकाऱ्यांना लाच स्विकारताना रंगेहाथ अटक केली. त्यामुळे ग्रामीण आरटीओ कार्यालयातील भ्रष्ट कारभाराचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री गडकरींच्या दाव्यांनाही बळ मिळत आहे.
या घडामोडीत वादाच्या भोवऱ्यात अडकूनही सप्टेंबर २०२४मध्ये नागपूर ग्रामीण प्रादेशिक परिवहन अधिकारी पदावर रुजू झालेल्या कथीत वादग्रस्त आरटीओ अधिकाऱ्याच्या कार्यकाळातच लाच लुचपत विभागाने पाच महिन्यांत चार वेळा लाच स्विकारताना भ्रष्ट अधिकाऱ्यांना रंगेहाथ अटक केली. त्यामुळे त्यांच्याच कार्यकाळात विभागात वाढलेल्या लाचखोरीमुळे प्रादेशिक परिवहन विभागात नव्या चर्चेला उधाण आले आहे.
नागपूर ग्रामीण प्रादेशिक विभागातल्या लाचखोरी प्रकरणात एसीबीने या आधी सप्टेंबर २०२४, जानेवारी २०२५, एप्रिल २०२५, आणि आता १७ ऑक्टोबर २०२५ असा चार वेळा सापळा रचत लाच स्विकारताना अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले आहे. ग्रामीण आरटीओतली लाचखोरीची मालिका यापूर्वीही घडली आहे. कांद्री येथे जानेवारी आणि मे २०२३ या वर्षातही लाचलुचपत विभागाने लाचखोर अधिकारी, कर्माचाऱ्यांना पकडले आहे. त्यात शुक्रवारी १७ ऑक्टोबरला लावलेल्या जाळ्यात आणखी दोन जण अडकले. त्यामुळे राज्यातील परिवहन विभागातल्या भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एरणीवर आला आहे.
काही महिन्यांपूर्वी प्रादेशिक विभागातल्या आर्थिक गैरव्यवहार उघड झाल्यानंतर तत्कालिन मुख्यमंत्री शिंदे यांनी चौकशीसाठी विशेष तपास पथक नेमले होते. पथकाने दिलेल्या अहवालात सात अधिकाऱ्यांची विदर्भाबाहेर बदली करावी, अशी स्पष्ट शिफारस सरकारला केली. यावरून विधानभेतही वादंग माजले. त्यानंतर सरकारने मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी बदल्या ऑनलाईन करण्याचे आदेश दिले होते.
नागपूर ग्रामीण प्रादेशिक विभागात परिवहन अधिकारी म्हणून सध्या विजय चव्हाण हे कार्यरत आहेत. मात्र राज्य सरकराने नेमलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालात त्यांच्याही नावाचा उल्लेख होता. त्यामुळे मधल्या काळात सरकारने तत्कालिन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण यांना पदोन्नती देत त्यांची कोल्हापूर येथे प्रादेशिक परिवन अधिकारी म्हणून बदली केली.
मात्र चव्हाण यांची अवघ्या तीन महिन्यांत पुन्हा नागपूर ग्रामीणमध्ये बदली झाली. ते रुजू झाल्यानंतर त्यांच्याच कार्यकाळात लाचलुचपत विभागाने इतक्या मोठ्या प्रमाणात लाचखोरीची कारवाई केल्याने आता नव्या चर्चेला उधाण आले आहे.
”विशेष तपास पथकाने केलेल्या चौकशीत मला बाजू मांडण्याची संधीच दिली गेली नव्हती. शिवाय सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असल्याने मी यावर प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. ” – विजय चव्हाण, प्रादेशिक परिवहन अधिकारी, नागपूर ग्रामीण.