नागपूर : शहराजवळच्या बाजारगाव परिसरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणात महत्वाची माहिती पुढे येत आहे. या घटनेत अत्यवस्थ असलेल्या ११ रुग्णांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या घटनेतील मृत्यू झालेल्यांची संख्या आता दोन वर पोहचली आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास आता केंद्रीय यंत्रणेकडूनही सुरू झाला आहे.
निकेश इरपाची असे दगवलेल्या रुग्णाचे नाव आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या व्हाट्सएप ग्रुपवर ही माहिती त्यांचे जनसंपर्क अधिकारी उज्वल भोयर यांनी प्रसारित केली आहे. दरम्यान शहराजवळच्या बाजारगाव परिसरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीतील स्फोट प्रकरणाची केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध यंत्रणेकडून तपासणी सुरू झाली आहे. विविध यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची झडती घेतली. तसेच कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाकडून संबंधित माहितीसुद्धा मागितल्याचे सूत्रांनी सांगितले.
बाजारगाव परिसरातील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत बुधवारी मध्यरात्री १२.३० च्या सुमारास झालेल्या भीषण स्फोटात मयूर गणवीर (२५ रा. चंद्रपूर) या कंपनी सुपरवायझरचा जागीच मृत्यू तर ४० जण गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी ११ जणांची प्रकृती गंभीर आहे. घटनेचे गांभिर्य बघत पेट्रोलियम आणि स्फोटके सुरक्षा संघटना (पी.ई.एस.ओ.), उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा (एच.ई.एन.आर.एल.), अग्नि, स्फोटक आणि पर्यावरण सुरक्षा केंद्र (सी.एफ.ई.ई.एस.), औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य संचालनालय (डी.आय. एस.एच.), स्थानिक पोलिसांसह इतर यंत्रणेकडून घटनेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. या यंत्रणेतील अधिकाऱ्यांनी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनेशी संबंधित काही विशिष्ट माहिती मागितल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या यंत्रणेच्या सूक्ष्म तपासणीनंतरच घटनेचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.
बच्चू कडूंच्या आंदोलनाकडे लक्ष
प्रहार संघटनेचे प्रमुख व माजी मंत्री बच्चू कडू यांनी गुरुवारी कंपनीच्या द्वारावर आंदोलन करत मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी पोलिसांकडे केली होती. त्यानंतरही पोलिसांनी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे आता एकीकडे या तपास यंत्रणेचा अहवाल तर दुसरीकडे कडू यांचे आंदोलन होणार काय? व ते कुठे कशा पद्धतीने होईल? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पोलीस अधीक्षकांचे म्हणणे काय ?
पोलिसांसह केंद्र सरकारच्या अखत्यारित असलेल्या ‘पेसो’ आणि इतर यंत्रणेसह राज्यातील विविध यंत्रणेकडून स्फोट प्रकरणाची तपासणी सुरू आहे. ‘पेसो’च्या अहवालानंतर गुन्हा कुणावर दाखल करावा, हे निश्चित होईल. शुक्रवारी कुणाचा जबाब घेतला नाही, अशी माहिती नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी लोकसत्ताशी बोलतांना दिली.