प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांचे सूतोवाच
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ लवकरच पीएच.डी. ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे उमेदवारांना दिलासा तर पीएच.डी.मध्ये वाङ्मयचौर्य करणाऱ्यांवर बडगा उगारणार असल्याचे सुतोवाच प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी ‘लोकसत्ता’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीदरम्यान केले.
डॉ. येवले यांनी प्र-कुलगुरू पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्याच्यादृष्टीने अनेक जोखमीचे निर्णय घेतले. त्यातून त्यांच्यावर टीकाही झाली. वर्षभरात १७०० ते १८०० परीक्षा, ४ लक्ष विद्यार्थी, विद्यापीठाचे ३९ विभाग आणि ६६८ संलग्नित महाविद्यालयांच्या कारभाराबरोबरच विद्यापीठात नव्यानेच दाखल करण्यात आलेली सत्र परीक्षा पद्धत व क्रेडिट बेस सिस्टिम, हा सर्व विचार करून उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग, ऑनलाईन मूल्यांकन, अभियांत्रिकीच्या ऑनलाईन प्रश्नपत्रिकांचा पुरवठा करणे आणि पीएच.डी. ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया असे कितीतरी महत्त्वपूर्ण निर्णय प्र-कुलगुरूंनी त्यांच्या एक वर्षांच्या कार्यकाळात घेतले आहेत. परीक्षा विभागात १२० स्कॅनर लावून २५ ते २७ हजार उत्तरपत्रिकांचे एकाच दिवशी स्कॅनिंग आणि २७२ संगणक लावून १६,००० उत्तरपत्रिकांचे एकाच दिवशी मूल्यांकनाचा महत्त्वांकाक्षी उपक्रम प्र-कुलगुरूंनी यशस्वी करून दाखवला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठाच्या परीक्षा विभागात मोठय़ा प्रमाणात अंतर्गत बदल करण्यात आले आहेत.
तिसऱ्या वर्षांचे बी.ए., बी.कॉम. बी.एस्सी.चे निकाल वेळेवर लावणे किंवा विद्यार्थ्यांना परीक्षेच्या आदल्यादिवशी किंवा परीक्षा केंद्रावर हॉल तिकीट मिळण्याऐवजी ते १५ दिवसांच्या आधी त्यांच्या हातात पडावेत, अशी विद्यार्थ्यांची कमीतकमी अपेक्षा असते. ती देखील पूर्ण करण्याचा संकल्प असून परीक्षा विभागात करण्यात आलेले बदलांचे फळ येत्या काही दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना चाखता येईल, असा विश्वास डॉ. येवले यांनी यावेळी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांना त्यांच्या पीएच.डी.चे ‘स्टेटस’ कळावे म्हणून ट्रॅकिंग सिस्टिमद्वारे उमेदवारांना ऑनलाईन अद्ययावत माहिती देण्याची पद्धत विद्यापीठात लवकरच सुरू करण्यात येणार आहे. जेणे करून पीएच.डी. अहवाल पाठवल्यानंतर उमेदवाराला पीएच.डी. प्रक्रिया कुठवर आली आहे. ते ऑनलाईन समजेल. त्यासाठी विद्यापीठात चकरा मारण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर विद्यापीठ वाङ्मय चौर्यासंबंधी धोरण बनवणार आहे. विद्यापीठात त्यासंबंधीचे धोरण अद्याप नसल्याने पहिल्यांदा असे धोरण ठरवणारी समिती वाङ्मय प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली असून तिचा अहवाल एक महिन्यात विद्यापीठाला सादर करण्यात येईल. ही समिती वाङ्मय चौर्याची, निकष, वाङ्मय चौर्य करणाऱ्यांचा शोध घेण्यासंबंधीचे सॉफ्टवेअर (चेकर) आणि एखादा सापडलाच तर त्याला योग्य ती शिक्षा देण्याचे प्रावधान धोरणात करणार आहे. यासोबतच डी.एस्सी. आणि डी.लिट.सारखे सन्मान मिळवण्यासाठी उमेदवारांना यापुढे पुरेशी मेहनत करावी लागेल. हा सन्मान प्रदान करताना उमेदवारांच्या गुणवत्तापूर्ण संशोधनावर भर देण्यात येईल, अशी माहिती डॉ. येवले यांनी दिली.
..तर ‘ते’ प्रकरण ‘डीएसी’समोर
प्राध्यापकांनी आकसाने एखाद्या विद्यार्थ्यांला प्रात्यक्षिक परीक्षांमध्ये अनुत्तीर्ण करण्याचे प्रकार क्वचित घडतात. मात्र, असे प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवनावर दूरगामी परिणाम करीत असतात. असे प्रकार मॉरिस महाविद्यालयातील पदव्युत्तर संस्कृत विषयाला प्रवेश घेणाऱ्या सात विद्यार्थिनी आणि सावनेरच्या एका महाविद्यालयात घडले आहेत. मॉरिस महाविद्यालयातील विद्यार्थिनींचे प्रकरणही विद्यापीठाला प्राप्त झाले असून त्यासंबंधी एक समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच समितीचा अहवाल प्राप्त होईल. त्यात संबंधित प्राध्यापक दोषी आढळल्यास शिस्तपालन कृती समितीसमोर (डीएसी) हे प्रकरण पाठवण्यात येईल, असे डॉ. प्रमोद येवले म्हणाले.