नागपूर : शहरात २०२३ मध्ये एकूण २९७ अपघात झाले. यात २८४ जण दगावले. ‘हिट अँड रन’च्या प्रकरणात नागपूर १९ महानगरांच्या रांगेत पाचव्या स्थानी आहे. ‘हिट अँड रन’चे सर्वाधिक १०२५ मृत्यू लखनौत, ७९२ मृत्यू दिल्लीत, ३३५ मृत्यू इंदूर, २८५ मृत्यू बंगळूरूत नोंदवले गेले. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे.

राष्ट्रीय पातळीवरील गुन्ह्यांच्या सरासरी वार्षिक टक्केवारीत २५ टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. नागपुरात एकूण २४ हजार ३६ गुन्हे नोंदवले गेले. २०२२ या वर्षाच्या तुलनेत यात ४ हजार ८६९ घटनांची वाढ झाली. नागपुरातील गुन्हेगारीचा लोकसंख्येमागील दर हा ९६२.२ इतका वाढला आहे. उपराजधानीत दाखल एकूण गुन्ह्यांपैकी आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण ८४ टक्के आहे.

नागपुरात २०२३ मध्ये खुनाच्या ७९ घटना घडल्या. यात ८१ जण बळी गेले. सदोष मनुष्यवधाच्या १३ घटनांमध्ये १५ बळी गेले. आत्मत्येस प्रवृत्त करण्याच्या ६५ घटनांमधून ८४ जणांचा मृत्यू झाला. खुनाचा प्रयत्न करणाऱ्या १२१ घटनांमध्ये १२६जणांना गंभीर इजा झाल्या. प्राणघातक हल्ल्याच्या ९९४ घटनांमध्ये १०२४ नागपूकरांना दुखापती करण्यात आल्या. गंभीर दुखापतीच्या ६८६ घटनांमधून ६९९ जणांना मारहाण करून जखमी केले गेले. गंभीर प्राणघातक दुखापतीच्या २२८ घटनांमध्ये २६७ जण जखमी झाले. विनयभंगाच्या उद्देषाने हल्ला करत ३७४ महिलांना जखमी केले गेले. अपहरणाच्या एकूण ५२० घटनांमध्ये ६३८ जणांचे अपहरण झाले. बलात्काराच्या घटनांना १३२ महिला बळी पडल्या.

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे देशात १७ मृत्यू

देशात २०२३ मध्ये डॉक्टरांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे १७ रुग्णांचा मृत्यू झाला. यातल्या सर्वाधिक ६ घटना नवी दिल्लीत घडल्या. यात ६ जण दगावले. त्या खालोखाल उत्तर प्रदेशाततल्या गाझियाबाद , कर्नाटकातल्या बंगळुरूत प्रत्येकी ३ घटनांत ६ जण दगावले. मुंबईत २ आणि इंदूर, जयपूर आणि कोचित ३ जण मरण पावले.

ॲसिड हल्ल्यात दिल्ली पुढे

२०२३ मध्ये महिलांवरील ॲसिड हल्ल्याच्या २९ घटनांची नोंद घेतले गेली. यात सर्वाधिक ७ घटना एकट्या दिल्लीत नोंदवल्या गेल्या. त्या खालोखाल अहमदाबादेत ५, लखनौ, ४,सुरत, जयपूरमध्ये प्रत्येकी ३, तर पटणा, मुंबई, कानपूर, जयपूर, चेन्नई, गाझियाबाद आणि पुण्यात प्रत्येकी एक घटनेची नोंद घेतली गेली.