गडचिरोली : सुरक्षा दलांच्या कारवायांमुळे कोंडीत सापडलेल्या नक्षल नेत्यांनी सरकारपुढे गेल्या चार महिन्यात दोनवेळा शस्त्रसंधी आणि शांतीवार्ता प्रस्ताव ठेवला आहे. यावरून आता नक्षल चळवळीत फूट पडली असून केंद्रीय समिती सदस्य भूपती याचा हा वैयक्तिक निर्णय असल्याचे नक्षलवाद्यांच्या एका गटाचे म्हणणे आहे. तेलंगाना राज्य समिती प्रवक्ता जगन याने १९ सप्टेंबर रोजी पत्रक जारी करून सरकारला उत्तर देण्याचीही धमकी दिली आहे.

यावर्षी मे महिन्यात नक्षलवाद्यांनी सर्वात प्रथम पत्रक प्रसिद्ध करून सरकारकडे नक्षलविरोधी मोहीम थांबविण्याची विनंती केली होती. यात त्यांनी शस्त्रसंधीसह शांतीवार्ता प्रस्ताव देखील पुढे केला होता. मात्र, त्यानंतरही छत्तीसगडसह दंडकारण्यातील नक्षल प्रभावित भागात सुरक्षा यंत्रणांच्या कारवाया सुरूच आहे. २१ मे रोजी नक्षल चळवळीचा सर्वोच्च नेता नंबाला केशवराव उर्फ बसवराजूला सुरक्षा दलाने चकमकीत ठार केले. हा नक्षल चळवळीला बसलेला सर्वोच्च धक्का होता. त्यामुळे नक्षल नेत्यांचे मनोबल खचले आहे. यामुळे अनेक मोठे नेते आत्मसर्पणाचा मार्ग स्वीकारत आहेत.

दरम्यान, नक्षल चळवळीतील नेतृत्वातही बदल करण्यात आले. सीपीआय महासचिवपदी देवजी तर दंडकारण्याची जबाबदारी माडवी हिडमाकडे देण्यात आली. नेतृत्व बदलामुळे नक्षल चळवळीला नवे बळ मिळणार अशी चर्चा असतानाच केंद्रीय समिती सदस्य तथा संघटनेचा मोठा नेता भूपती उर्फ सोनू याने पुन्हा एकदा पत्रक प्रसिद्ध करून सरकारकडे शस्त्रसंधीची विनंती केली होती. मात्र, भूपतीच्या या भूमिकेला तेलंगाना राज्य समितीकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. प्रवक्ता जगन याने पत्रक जारी करून भूपतीची भूमिका अधिकृत नसल्याचे स्पष्ट केले.

ही पक्षाची ठरलेली भूमिका नाही. कोणत्याही प्रकारची शस्त्रसंधी किंवा शरणागतीचा प्रस्ताव हा संघटनेच्या शिस्तीला धक्का देणारा आहे,” असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. समितीच्या पत्रकात, सध्याच्या परिस्थितीत केवळ संघर्ष तीव्र करणे हाच मार्ग असल्याचे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात लढाई तीव्र करावी, अशी हाक देत भूपतीच्या विधानाला ‘गोंधळ निर्माण करणारा प्रयत्न’ म्हणून नाकारण्यात आले. यामुळे नक्षल चळवळीतील वरिष्ठ स्तरावरील वाद चव्हाट्यावर आला आहे.

चळवळीत दोन मतप्रवाह?

आजही नक्षल चळवळीतील वैचारिक भूमिका ठरविण्यात तेलगू भाषिक नक्षलवाद्यांची महत्त्वाची भूमिका आहे. तेलगू नेते उच्चशिक्षित आणि संयमित असल्याने चळवळीत त्यांना वेगळा मान आहे. महिनाभरापूर्वी दंडकारण्याच्या सीमा भागातील गोपनीयस्थळी काही महत्त्वाच्या नक्षल नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीतील चर्चेचा तपशील गोपनीय यंत्रणेतील काही महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागलेला आहे. त्यानुसार पहिल्यांदाच तेलुगु नेत्यांकडून बदला घेण्याची भाषा करण्यात येत आहे. तर हिडमा आणि देवजी गट काही काळ भूमिगत राहून सत्ताबदलाची प्रतीक्षा करावी या मताचे आहे. एरवी हिडमासारख्या कुख्यात नक्षलवाद्याची कायम आक्रमक भूमिका असायची तर तेलुगू नेते संयमाची भाषा करायचे. मात्र सशस्त्र बटालियनची बदललेली भूमिका अनेकांना बुचकळ्यात टाकणारी आहे.