नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोमवारी नागपुरात भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

रोहित पवार यांनी गडकरी यांच्या नागपुरातील निवासस्थानी सोमवारी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसिद्धी माध्यम प्रतिनिधींना मतदारसंघातील विकास कामासाठी भेट घेतल्याची माहिती दिली. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटीबाबत तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. गेल्या आठवड्यात वर्धा येथे झालेल्या एका कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि गडकरी एका व्यासपीठावर होते. आता रोहित पवार यांनी गडकरी भेट घेतली आहे. या भेटीबाब रोहित पवार म्हणाले, मतदारसंघात दोन राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासंदर्भात चर्चा केली. गडकरी विरोधी पक्षातील आमदार, नेत्यांना नेहमी ते मदत करीत असतात, असेही ते म्हणाले. 

राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकालाही रोहित पवार यांनी उत्तर दिले.  राज ठाकरे कधी भाजपा विरोधात, तर कधी त्यांच्या बाजूने बोलतात, कधी शरद पवार यांच्या बाजूने तर कधी विरोधात बोलतात, त्यांची भूमिका नेहमी बदलत राहते. त्यामुळेच राज्यात त्यांचा एकच आमदार आहे. त्यांच्याकडे नाशिकची महापालिकाही होती. पण पुढे तीसुद्धा त्यांच्या हातातून गेली, यावरूनच त्यांची विश्वासार्हता कमी झाल्याचे दिसून येत आहे, असे रोहित पवार म्हणाले.\

हेही वाचा >>>Rohit Pawar : “तुम्ही महाराष्ट्र धर्मावर विश्वास ठेवणारे नेते, फक्त…”; राज ठाकरेंबाबत नेमकं काय म्हणाले रोहित पवार?

 छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपने केलेल्या आंदोलनाबाबत ते म्हणाले, भाजपा कशासाठी आणि कुठे आंदोलन करते, हे पण त्यांना कळत नाही. पक्षश्रेष्ठींकडून आदेश आला की ते नाचत बसतात. राज्यात सामान्य कुटुंबातील महिला सुरक्षित नाही. अशावेळी भाजपाचे लोक काल्पनिक विषय काढून आंदोलन करीत आहेत. कुठे आंदोलन करायचे आणि कशासाठी करायचे नाही, हेसुद्धा भाजपाच्या लोकांना कळत नाह, अशी टीकाही त्यांनी केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मता विभाजनासाठी राज ठाकरेंचा वापर होऊ नये

मतांच्या विभाजनावर भारतीय जनता पक्षाचा भर असतो. त्यासाठी ते एखाद्या पक्षाचा वापर प्रतिस्पर्धी पक्षाची मते कमी करण्याठी करतात, असे दिसून आले आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तसा वापरू होणार नाही याची काळजी घ्यावी, असे वक्तव्य  आमदार रोहित पवार यांनी केले.