अकोला : भारताचे पहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे कृषी महाविद्यालय स्थापन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली. गत आठ वर्षांपासून हा प्रस्ताव प्रलंबित होता. या संदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रणधीर सावरकर यांनी पाठपुरावा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न मार्गी लावला. या संदर्भात कृषी विभागाने शासन निर्णय निर्गमित केला असून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे संग्लनीत आणखी एक महाविद्यालय वाढले आहे.

शेतकऱ्यांसाठी संपूर्ण आयुष्य समर्पित करणारे डॉ. पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ येथे कृषी महाविद्यालय सुरू करण्याची जुनी मागणी होती. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी १९३२ मध्ये श्री शिवाजी एज्युकेशन संस्थेची स्थापना केली. ही संस्था मध्य भारतातील सर्वात मोठी शैक्षणिक संस्था असून २८९ शैक्षणिक संस्थाच्या जाळ्यां‌द्वारे शिक्षण दिले जाते.

डॉ. पंजाबराव देशमुख यांचा प्रेरणादायी वारसा पुढे कायम ठेवण्यासाठी त्यांचे जन्मगाव पापळ येथे संस्थेस दान दिलेल्या सुमारे ५० हेक्टर शेत जमिनीवर नवीन कृषी पदवी महावि‌द्यालय सुरू करण्याचा प्रस्ताव डॉ. पंजाबराव देशमुख कृषी वि‌द्यापीठाच्या मान्यतेसह महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषदेमार्फत शासनास ०१ जून २०१७ रोजी सादर केला होता. हा प्रस्ताव सुमारे आठ वर्षांपासून मंजुरीच्या प्रतीक्षेत होता.

संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख यांची नवीन कृषी महावि‌द्यालय सुरू करण्यासाठी आग्रही मागणी होती. या प्रस्तावानुसार नवीन कृषी महाविद्यालय मंजुर होण्यासाठी आमदार रणधीर सावरकर यांनी शासनाकडे सातत्यपूर्ण पाठपुरावा केला. त्यानंतर १७ ऑक्टोबरला कृषी विभागाने महाविद्यालयावर मंजुरीची मोहर लावली.

शिवाजी संस्थेच्या पापळ येथील जमिनीवर ६० विद्यार्थी प्रतिवर्ष प्रवेश क्षमता असलेले खासगी कायमस्वरूपी विनाअनुदानित तत्वावरील नवीन कृषी महाविद्यालय विशेष बाब म्हणून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या समाज माध्यम खात्यावर हे कृषी महाविद्यालय मंजुर झाल्याबद्दल आनंद व्यक्त करून यासाठी आ.रणधीर सावरकर यांनी पाठपुरावा केल्याचे म्हटले आहे.

डॉ. पंजाबराव यांचे शिक्षण व कृषी क्षेत्रातील योगदान लक्षात घेता त्यांचे जन्मगाव पापळ येथे कृषी महाविद्यालय मंजूर करण्यात आले. त्यांच्या शिक्षण क्षेत्रातील कार्याचा गौरव करुन शेतकऱ्यांप्रति असलेली स्वप्ने साकार होण्यासाठी हे महत्वपूर्ण पाऊस असल्याचे आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.