पक्षाघाताचे २० टक्के रुग्ण चाळीशीच्या आतील

पक्षाघातामुळे होणाऱ्या मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या क्रमांकावर आले.

वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीचे निरीक्षण; जागतिक पक्षाघात दिवस आज

नागपूर : पक्षाघात हा कुठल्याही वयात होऊ  शकतो . जगाच्या तुलनेत भारतात पक्षाघाताचे प्रमाण तरुणांमध्ये जास्त आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजीच्या ग्रुपच्या निरीक्षणानुसार देशात पक्षाघाताचे २० टक्के रुग्ण हे ४० वर्षांपेक्षा कमी वयाचे असतात. २९ ऑक्टोबरला जागतिक पक्षाघात दिवस असून त्यानिमित्त घेतलेला हा आढावा.

पक्षाघातामुळे होणाऱ्या मृत्यू आणि अपंगत्वाचे प्रमाण जगात दुसऱ्या क्रमांकावर आले. जगात दरवर्षी १ कोटी ५० लाख लोकांना पक्षाघात होतो. पैकी ६० लाख लोक दगावतात. यातील ८० टक्के रुग्ण हे आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या देशाचे असतात. जंक फूड, धूम्रपान, मद्यपान, व्यायाम न करणे, ताण-तणाव यामुळे भारतात तरुणामध्ये पक्षाघाताचे प्रमाण वाढत आहे. मेंदूमध्ये प्राणवायू आणि पोषकद्रव्ये वाहून नेणारी रक्तवाहिनी एकतर गठ्ठा द्वारे अवरोधित केली जाते किंवा फुटते तेव्हा पक्षाघात होतो. ८० टक्के रुग्णामध्ये मेंदूची रक्तवाहिनी बंद होते आणि २० टक्के रुग्णांमध्ये रक्तवाहिनी फाटते.

पक्षाघाताची सुरुवातीची चिन्हे ओळखणे महत्त्वोचे आहे. चेहरा तिरपा होणे, हातात कमजोरी येणे आणि आवाजात फरक पडणे हे पक्षाघाताची प्रमुख लक्षणे आहेत. चालताना अडचण येणे, शरीराच्या एका बाजूला मुंग्या येणे, दृष्टिदोष होणे, चक्कर येणे, गिळण्यास त्रास होणे, गोंधळ होणे इत्यादी पक्षाघाताची इतर लक्षणे देखील आहेत. अचानक उद्भवणारे कोणतेही लक्षण पक्षाघातामुळे असू शकते.

पक्षाघाताच्या उपचारात बरीच प्रगती झाली आहे. लवकर निदान आणि त्वरित उपचार यामुळे निम्म्या रुग्णांत मृत्यू आणि अपंगत्व कमी येते. पक्षाघात ग्रस्त व्यक्ती तातडीने रुग्णालयात पोहोचल्यास त्याला वेळीच उपचार मिळून तो अल्पावधीतच बरा होऊ  शकतो. पक्षाघाताविषयी अज्ञान आणि चुकीच्या धारणा योग्यप्रकारे सोडवल्या पाहिजेत. आपल्या देशात असे अनेक विधी पाळले जातात जसे की स्ट्रोकच्या पेशंटला केरोसीन देणे धोकादायक आहे आणि त्यामुळे एखाद्य रुग्णाला मृत्यू येऊ  शकतो. एकदा पक्षाघात झाल्यानंतर चारपैकी एकाला परत पक्षाघात येऊ 

शकतो, म्हणूनच त्या व्यक्तीने आजीवन औषधे घ्यावीत आणि जीवनशैलीत बदल करावा,

असे वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरोलॉजीच्या ट्रॉपिकल न्यूरोलॉजी ग्रुपचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले.

९० टक्के रुग्णांत पक्षाघाताचे कारण

उच्च रक्तदाब, धूम्रपान, मधुमेह, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि उच्च कोलेस्ट्रॉल, तणाव, चुकीचा आहार, मद्यपान आणि मादक पदार्थांचा गैरवापर, हृदयविकार, वायू प्रदूषण आणि व्हिटॅमिन बी १२ ची कमी

हे ९० टक्के रुग्णामध्ये पक्षाघाताचे कारण असते असेही डॉ. मेश्राम म्हणाले. पक्षाघाताच्या निम्म्याहून अधिक रुग्णांना अपंगत्व येते. लवकर चांगली प्रकृती होण्यासाठी वेळीच रुग्णालयात दाखल होऊन उपचार फायद्याचे असते.

पक्षाघात दिनानिमित्त आज कार्यक्रम

जागतिक पक्षाघात दिनानिमित्त इंडियन अ?ॅकॅडमी ऑफ न्यूरोलॉजीने २९ ऑक्टोबरला सायंकाळी ६ वाजता आभासी बैठकीद्वारे जनजागृती उपक्रमाचे आयोजन केले आहे. त्याचे उद्घाटन डॉ जे. एम. के. मूर्ती करतील. याप्रसंगी देशाच्या विविभ भागातून डॉ. कामेश्वर प्रसाद स्ट्रोकसंबंधी माहिती देतील. तर डॉ. निर्मल सूर्या, डॉ. सुनील नारायण, डॉ. श्रीजितेश, डॉ. दीपिका जोशी सहभागी होतील. कार्यक्रमाचे संयोजक डॉ. चंद्रशेखर मेश्राम आणि डॉ. यू. मीनाक्षी सुंदरम आहेत. समाजमाध्यमावर हा कार्यक्रम पाहता येईल.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व नागपूर बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Observations of the world federation of neurology world paralysis day today akp