लोकसत्ता टीम

नागपूरः गुन्हेगारी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्या एका पोलीस हवालदाराला आणि रेल्वेत विनयभग करणाऱ्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांवर पोलीस आयुक्तांनी कारवाई केली.

गांजा तस्करीत सहभागी असलेल्या एका हवालदाराला बडतर्फ केले आहे तर सहकारी महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग करणाऱ्या दोन पोलिसांना निलंबित केले आहे. यापुढे अवैध कामांत सहभागी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर लगेच कठोर कारवाई करण्याचा इशारा यातून देण्यात आला आहे. या कारवाईमुळे पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. रोशन उगले असे बडतर्फ हवालदाराचे नाव आहे. तर युवराज राठोड व आदित्य यादव यांना निलंबित करण्यात आले आहे.

आणखी वाचा-नागपूर : विद्यार्थिनींचा लैंगिक छळ करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाचा परवाना निलंबनाबाबत हालचाली

रोशन उगले याला २०२१ मध्ये पत्नीसह ओरिसा येथून गांजाची खेप आणताना रंगेहाथ पकडण्यात आले होते व एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी रोशनला निलंबित करण्यात आले होते. विभागीय चौकशीही करण्यात आली. तब्बल तीन वर्षे उलटून गेल्यानंतरही रोशनवर कोणतीही कठोर कारवाई झाली नव्हती. या प्रकाराची माहिती मिळताच पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंगल यांनी तातडीने कारवाई केली व त्याला नोकरीतून बडतर्फ करण्याचा आदेश जारी करण्यात आला.तर युवराज राठोड व आदित्य यादव यांनी पुणे जिल्ह्यात निवडणूक ड्युटीसाठी पाठविण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विविध पोलीस ठाण्यातील महिला व पुरुष कर्मचारी रेल्वेने पुण्याला जात होते. यावेळी दोघांनी मद्य प्राशन केले व रेल्वेच्या डब्यात गोंधळ घातला. नशेत त्यांनी सहकारी महिला कर्मचाऱ्याशी आक्षेपार्ह वर्तन केले. त्यांना विरोध केला असता त्यांनी शिवीगाळ सुरू केली. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी या कृत्याचा व्हिडिओ बनवला. पीडित महिला कर्मचाऱ्याने जीआरपीकडे विनयभंगाची तक्रार दाखल केली. हे प्रकरण तापताच दोन्ही जवानांना नागपूरला बोलावण्यात आले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस आयुक्त डॉ. सिंगल यांनी दोघांनाही निलंबित केले.