नागपूर: मराठवाड्यासह राज्यातील काही भागात मराठा आंदोलक आक्रमक झाले आहे. त्यामुळे नागपूरहून एसटीने मराठवाड्याकडे निघालेल्या बसेस मध्येच अडकून पडत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. गेल्या दोन दिवसांत मराठवाड्याला जाणाऱ्या २२ फेऱ्या प्रभावित झाल्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एसटी महामंडळाच्या माहितीनुसार, नागपूरहून यवतमाळ मार्गे पंढरपूर जाणारी बस रविवार आणि सोमवारी निघाली. परंतु, ही बस पुसदमध्येच अडकून पडली. त्यामुळे २८ ऑक्टोबरला नागपूर-पंढरपूर बस ९७० किलोमीटर तर सोलापूर-नागपूर बस ५११ किलोमीटरचा प्रवास रद्द झाला. तर २९ ऑक्टोबरला नागपूर-पंढरपूर बसचा ९७० किलोमीटर प्रवास रद्द झाला. नागपूर-सोलापूर बस ही उमरखेडपर्यंतच धावली. त्यामुळे या बसचा ६६७ किलोमीटर प्रवास रद्द झाला. तर नागपूर-अंबेजोगाई बस ही पुसदपर्यंतच गेल्याने या बसचा ४९६ किलोमीटरचा प्रवास रद्द झाला.

हेही वाचा… ‘सीसीटीएनएस’मध्ये अकोला पोलीस राज्यात सातवे, तर विभागात प्रथम

नागपूरहून अमरावती मार्गे धावणाऱ्या पुणे बस (शिवशाही)चे २८ आणि २९ ऑक्टोबरला प्रत्येकी १ हजार ५२८ किलोमीटर प्रवास रद्द झाला, तर नागपूर ते छत्रपती संभाजीनगर धावणाऱ्या बस प्रवासी आंदोलनामुळे अकोल्यातच अडकून पडल्या. येथे बस रद्द झाल्याने या मार्गावरील ५१९ किलोमीटर प्रवास रद्द झाला. त्यामुळे नागपूर विभागातून मराठवाड्याकडे जाणाऱ्या सगळ्याच बसचा तब्बल ७ हजार ७०९ किलोमीटर प्रवास रद्द झाल्याची माहिती एसटी महामंडळाकडून दिली गेली. या वृत्ताला एसटीच्या अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला.

सणानिमित्त घरी जाणाऱ्यांची चिंता वाढली

राज्याच्या विविध भागातून मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक शिक्षण, व्यवसाय, नोकरीनिमित्त नागपुरात येत असतात. सणानिमित्त हे सगळे आपल्या घरी जातात. त्यापैकी अनेकांना एसटी बस हा घरी परतण्यासाठीचा उत्तम पर्याय वाटतो. त्यातच दिवाळीच्या तोंडावर मराठा आंदोलक आक्रमक होऊन एसटीच्या फेऱ्या प्रभावीत झाल्याने घरी परतण्याचे नियोजन करणाऱ्यांची चिंता वाढली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Passengers are suffering as st buses from nagpur to marathwada are getting stuck due to maratha reservation mnb 82 dvr
First published on: 31-10-2023 at 09:15 IST