गडचिरोली : पोलिसांच्या प्रभावी नक्षलवादविरोधी मोहिमेला बुधवारी आणखी एक मोठे यश मिळाले आहे. महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांच्यासमोर ६ जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण केलेल्यांमध्ये दोन डिव्हीसीएम (डिव्हिजनल कमिटी मेंबर), एक कमांडर, दोन पीपीसीएम (पार्टी मेंबर कमिटी मेंबर) आणि एक एसीएम (एरिया कमिटी मेंबर) यांचा समावेश आहे. या सर्व नक्षलवाद्यांवर महाराष्ट्र शासनाने एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये भिमन्ना ऊर्फ व्यंकटेश ऊर्फ सुखलाल मुत्तय्या कुळमेथे (वय ५८) आणि त्याची पत्नी विमलक्का ऊर्फ शंकरअक्का सडमेक (वय ५६) यांचा समावेश आहे. दोघेही डिव्हिजनल कमिटी मेंबर (डीव्हीसीएम) म्हणून कार्यरत होते. त्यांच्यासोबत कविता ऊर्फ शांती मज्जी (कमांडर), नागेश ऊर्फ आयताल माडवी (पीपीसीएम), समीर पोटाम (पीपीसीएम) आणि नवाता ऊर्फ रुपी मडावी (एसीएम) यांनीही शरणागती पत्करली. या सर्वांवर विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यांच्यावर महाराष्ट्र शासनाने मोठे बक्षीस जाहीर केले होते. आत्मसमर्पणानंतर त्यांना शासनाच्या पुनर्वसन योजनेंतर्गत आर्थिक मदत दिली जाणार आहे.
नक्षलवादविरोधी अभियानाचे यश
गडचिरोली पोलीस आणि सीआरपीएफच्या संयुक्त प्रयत्नांमुळे नक्षलवादविरोधी अभियानाला मोठी गती मिळाली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ४० नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने २००५ पासून आत्मसमर्पण योजना जाहीर केली असून, आतापर्यंत एकूण ७१६ नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे.
पोलीस महासंचालकांचा गडचिरोली दौरा
पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला यांनी अपर पोलीस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे यांच्यासह गडचिरोली जिल्ह्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी नवनिर्मित पोलीस स्टेशन कवंडे येथे भेट देऊन जवानांशी संवाद साधला. तत्पूर्वी पोलीस मुख्यालयातील एकलव्य सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात नक्षलवादविरोधी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अपर पोलीस अधीक्षक (अभियान) एम. रमेश आणि अपर पोलीस अधीक्षक अहेरी सत्य साई कार्तिक यांच्यासह सी ६० जवानांचा सत्कार करण्यात आला. तसेच, नक्षलवाद्यांकडून मारल्या गेलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.
यावेळी आपल्या भाषणात शुक्ला यांनी गडचिरोली पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक केले आणि उर्वरित नक्षलवाद्यांना हिंसा सोडून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचे आवाहन केले. यावेळी अपर पोलीस महासंचालक(विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, विशेष पोलीस महानिरीक्षक संदिप पाटील, सिआरपीएफ उप महानिरीक्षक अजयकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक गोकुल राज जी यांच्यासह मोठ्या संख्येने अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.