गोंदिया: गोंदिया तालुक्यातील शेतशिवारात सुनसान परिसरात बेकायदेशीरपणे चालवल्या जाणाऱ्या इंग्रजी दारू बनवणाऱ्या मिनी कारखान्यावर छापा टाकून गोंदिया पोलिसांनी मोठ्या प्रमाणात विविध ब्रँडची बनावट इंग्रजी दारू बनवण्याचे साहित्य जप्त केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना कारखान्यातून अटक केली तर तिघे अंधाराचा फायदा घेत फरार झाले आहे.

गोंदिया शहरा लगत असलेल्या भागवतटोला गावच्या हद्दीतील शेताच्या आवारात घरासारख्या बांधलेल्या गोठ्या मध्ये धमेंद्र डहारे (रा. ढाकणी) नावाचा व्यक्ती त्याच्या अन्य साथीदारांच्या मदतीने बनावट इंग्रजी दारू तयार करत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली.

माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे यांच्या सूचनेवरून एलसीबीच्या पथकाने मंगळवार २९ एप्रिल रोजी मध्यरात्री १२.३० वाजता भागवतटोला येथील शेतशिवारात छापा टाकला, मात्र पोलीस आल्याची माहिती मिळताच काही जणांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत पळ काढला. तर कारखान्यात काम करणाऱ्या, अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये हंसराज सुखचंद मस्करे (४९ रा. ढाकणी), जितेंद्र गोधनलाल नागपुरे (३६ रा. ढाकणी) आणि गुलाब किशन वाढे (४० रा. ओजिटोला) यांचा समावेश आहे.

या छाप्यामध्ये पोलिसांनी दारू निर्मितीमध्ये वापरले जाणारे स्पिरीट, रिकाम्या बाटल्या, डुप्लिकेट लेबल, विविध रंगांचे चॉकलेट फ्लेवर, ४ मोटार सायकल, प्लॅस्टिकचे डबे, ड्रम, तयार बनावट इंग्लिश मद्य व पंचनामा मद्य व इतर साहित्य असा एकूण ५ लाख ८८ हजार २६० रुपयांचा माल जप्त केला आहे.

याप्रकरणी फिर्यादी पोलिस उप निरीक्षक शरद सैदाणे यांच्या फिर्यादीवरून रामनगर पोलीस ठाण्यात अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींविरुद्ध तसेच फरार आरोपी धमेंद्र डहारे व इतरांविरुद्ध कलम महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम १२३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहे.

ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक गोरख भामरे, अप्पर पोलिस अधीक्षक नित्यानंद झा, उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली रोहिणी बनकर व एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश लबडे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि धीरज राजूरकर, पोउपनि शरद सैदाणे, पोलिस हवालदार राजेंद्र मिश्रा, महेश मेहर, भुवन देशमुख, सुजित हलमारे, प्रकाश गायधने, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, दुर्गेश तिवारी, घनश्याम कुंभलवार, राम खंदारे, लक्ष्मण बंजार आदींनी कारवाई केली.

शेजारील जिल्ह्यात विक्रीसाठी

गोंदिया जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अशाप्रकारे बनावट इंग्रजी दारू निर्मिती करून ती शेजारील गडचिरोली जिल्ह्यात विक्री करिता रात्री दरम्यान पाठवितात. या पूर्वीही अशी कारवाई नागपूर येथील पथकांनी गोंदिया शहरातील बाजपेयी चौकात केली होती.