अकोला : शहरात बसस्थानकासमोर उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलाला नाव देण्यावरून राजकारण तापले आहे. स्व.विनयकुमार पाराशर यांच्या नावाचा आग्रह वंचित आघाडीने धरला, तर महापालिकेत अगोदरच ठराव घेऊन पुलांची नावे निश्चित केल्याची भूमिका भाजपने घेतली. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा कालावधी संपुष्टात आल्याने त्यांना नाव देण्याचा अधिकारच नाही. नावासह इतर कारणांवरून वादात असलेल्या उड्डाणपुलांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी लोकार्पण करूनच नये, ते लोकार्पणासाठी आल्यास वंचित आघाडीच्यावतीने त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली.

शहरात दोन उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्या उड्डाणपुलांचे लोकार्पण २८ मे रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते करण्यात येणार आहे. उड्डाणपुलाच्या नावावरून भाजप व वंचित आघाडी आमने-सामने आले आहेत. दोन दिवसांपूर्वी वंचित आघाडीने टॉवर चौकात उड्डाणपुलावर स्व.विनयकुमार पाराशर यांच्या नावाचा फलक लावला होता. यावर भाजपने सावध भूमिका घेत,स्व.विनयकुमार पाराशर यांच्या नावाचा आम्हाला आदर आहे, मात्र यापूर्वीच महापालिकेत ठराव घेऊन उड्डाणपुलांना नावे देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

लोकभावना लक्षात घेता उड्डाणपुलाला स्व.पाराशर यांचे नाव देण्याची वंचित आघाडीची मागणी आहे. भाजपच्या कृतीचा आम्ही निषेध करतो. भविष्यात वंचित आघाडी महापालिकेत सत्तेत आल्यास उड्डाणपुलाला स्व.पाराशर यांचे नाव देण्यात येईल, असे डॉ.पुंडकर यांनी सांगितले. उड्डाणपुलांचे चुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासंदर्भात अनेक तक्रारी आहेत. त्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी उड्डापुलांच्या लोकार्पणाला येऊ नये, ते आल्यास आम्ही त्यांना काळे झेंडे दाखवू, असे देखील ते म्हणाले.

गडकरींनी तलावांपेक्षा अर्धवट रस्त्यांची पाहणी करावी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आपल्या अकोला जिल्ह्याच्या दौऱ्यात कृषी विद्यापीठात परिसरात महामार्गाच्या कामातून निर्माण करण्यात आलेल्या तलावांची पाहणी करणार आहेत. त्यापेक्षा नितीन गडकरींनी जिल्ह्यातील रस्त्यांच्या अर्धवट कामांची पाहणी करावी, असा टोला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे यांनी लगावला