नागपूर : जिल्ह्यातील (ग्रामीण) सरकारी, निमसरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सोमवारपासून मुखपट्टी (मास्क) लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी काढले आहेत. चीनमध्ये करोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे.

या विषाणूचा शिरकाव भारतात होण्याची शक्यता लक्षात घेऊन व करोनाला प्रतिबंध घालण्यासाठी जिल्हाधिकारी व आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. विपीन इटनकर यांनी हे आदेश काढले. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच करोना आढावा बैठक झाली. यावेळी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) विशाल आनंद, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता राज गजभिये, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता संजय बिजवे, एम्सच्या संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. विभा दत्ता, जिल्हा शल्यचिकित्सक डॅा. एन.बी. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा. दीपक सेलोकार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अंकुश गावंडे, टास्क फोर्सचे रवींद्र सरनाईक, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, आरोग्य यंत्रणेचे वरिष्ठ अधिकारी, जिल्ह्यातील विविध रुग्णालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हेही वाचा: चीनमधून येणाऱ्यांना करोना चाचणी अनिवार्य; जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, थायलंडहून येणाऱ्यांनाही ‘आरटी-पीसीआर’ अहवाल सक्तीचा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सर्व शासकीय व खाजगी रुग्णालयात २७ डिसेंबरला ‘मॅाक ड्रिल’चे आयोजन करण्यात येणार आहे. यात रुग्णालयातील खाटा, औषध, तपासणी, रुग्णवाहिका, व्हेंटिलेटर्स, टेलिमेडिसिन सेवा, मनुष्यबळाची उपलब्धता आदींचा आढावा घेण्यात येणार आहे. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर इतर देशांमधून येणाऱ्या प्रवाशांची करोना चाचणी सुरू करण्यात आलेली आहे. तसेच त्यांचे विलगीकरण करण्यात येणार आहे.