Naxal Leader Bhupathi Surrender: नागपूर: गडचिरोलीत आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)मध्ये यावे. त्यांना येत्या निवडणूकीत महत्वाची जबाबदारी दिली जाईल, अशी ऑफर थेट केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.नागपुरातील रविभवन येथे गुरूवारी (१६ ऑक्टोंबर २०२५) झालेल्या पत्रकार परिषदेत रामदास आठवले बोलत होते. नक्षलवाद्यांच्या त्यागाबाबत सहानुभूती आहे. ही चळवळ सामान्यांच्या न्यायासाठी असल्याचे त्यांचे म्हणने होते. परंतु हिंसक मार्गाने कोणत्याही चळवळीत कुणीही सहभागी होणे आमच्यासह कुणालाही मान्य नाही. नक्षलवाद्यांनी एखाद्दे अन्यायाचे कारण सांगत पोलीस, जमिनदारांना जीवानिशी ठार मारल्यास त्यांच्या एवजी दुसरा पोलीस व जमिनदार नियुक्त होतो. त्यामुळे नक्षलवाद्यांना वाटणारा प्रश्न सुटत नाही.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी माओवाद्यांचा पॉलिट ब्युरो मेंबर तसेच सेंट्रल कमिटी मेंबर मल्लोजूला वेणुगोपाल राव उर्फ सोनू उर्फ भूपती याने त्याच्या ५० सहकाऱ्यांसह गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले. या मोठ्या संख्येने नक्षल वाद्यांनी केलेले आत्मसमर्पन स्तूत्य उपक्रम आहे. या सगळ्यांनी मुख्य प्रवाहात यावे. या सगळ्यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)मध्ये प्रवेश करायलाही हरकत नाही. त्यांनी आमच्या पक्षाकडून निवडणूकही लढवावी. नवीन जिवनाची सूरवाच चांगली व्हायला हवी, असेही आठवले यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला पक्षाचे डॉ. पूरनचंद्र मेश्राम, राजन वाघमारे, ॲड. विजय आगलावे, बाळासाहेब घरडे, थूल उपस्थित होते.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) देशभरात असलेला पक्ष

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) पक्षाचे नागालॅन्डमध्ये दोन आमदार आहे. तर मनिपूरमध्येही नुकतीच पक्षाला अधिकृत मान्यता मिळाली आहे. महाराष्ट्रात येत्या लोकसभा निवडणूकीत आमच्या पक्षाला दोन जागा मिळाल्यास आणि त्या दोन्ही निवडून आल्यास आमच्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे शक्य आहे. देशातील जवळपास सगळ्याच राज्यांत आमचा पक्ष आहे. त्यामुळे देशभरात असलेला रिपब्लिकन गटातील आमचा एकमात्र पक्ष असल्याचेही रामदास आठवले यांनी सांगितले.

मुस्लिम विरोध ही राष्ट्रवादी भूमिका नाही

अजीत पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप यांनी नुकतेच दिवाळीत धर्म बघून दुकानातून खरेदी करण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यावर रामदास आठवले यांनीही भाष्य केले आहे. आठवले म्हणाले, मुस्लिम विरोधी वक्तव्य ही राष्ट्रवादी भूमिका नाही. संग्राम जगताप यांचे वक्तव्य चुकीचे आहे. संविधानात सगळ्याच धर्माला समान अधिकार दिले गेले आहे. त्यात मुस्लिम बांधवांनाही समान अधिकार असल्याचेही आठवले यांनी सांगितले.