नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला २ ऑक्टोबरला १०० वर्षे पूर्ण होत असून या शताब्दी वर्षांतील विजयादशमी उत्सवानिमित्त नागपुरात तीन ठिकाणी पथसंचलन होणार आहे.
२७ सप्टेंबरला तीन वेगवेगळ्या ठिकाणांहून एकाच वेळी पथसंचलन सुरू होईल. सायंकाळी ७.४५ वाजता व्हेरायटी चौकात सर्व पथसंचलनांचे एकत्रिकरण होईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ या पथसंचलनांचे अवलोकन करतील. त्यानंतर स्वयंसेवक आपापल्या मार्गाने परत जातील. संचलन क्रमांक १चा मार्ग- कस्तुरचंद पार्क – संविधान चौक – झिरो माईल – व्हेरायटी चौक – महाजन मार्केट – हॉटेल गणराज – टेकडी हनुमान मंदिर मार्ग – झिरो माईल – संविधान चौक – कस्तुरचंद पार्क असा आहे.
संचलन क्रमांक २ चा मार्ग – यशवंत स्टेडियम – मुंजे चौक – व्हेरायटी चौक – झाशी राणी चौक – पंचशील चौक – लोकमत चौक – हम्पयार्ड टी पॉईंट – धंतोली पोलीस स्टेशन चौक – मेहाडिया चौक – यशवंत स्टेडियम असा आहे. संचलन क्रमांक ३ चा मार्ग- भारतीय हॉकी मैदान (अमरावती रोड) – व्हेरायटी चौक – फ्रिडम पार्क चौक – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ -– हॉकी मैदानाकडे परत जाईल.
शताब्दी वर्ष असल्याने संघातर्फे संवाद सत्रे आयोजित करण्यात आली आहेत. दिल्ली येथे २६ ते २८ ऑगस्ट दरम्यान संवाद सत्र पार पडले. पुढील सत्रात ७ व ८ नोव्हेंबर – बंगळुरू, २१ डिसेंबर – कोलकाता तर ७-८ फेब्रुवारीला मुंबई येथे सरसंघचालकांचे संबोधन होईल.
विजयादशमी उत्सवानिमित्ताने शिशू व बालवर्गाचा उत्सव २८ सप्टेंबर आणि ५ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होईल. मणिपूरमध्येही उत्सवाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन होणार आहे. यंदाच्या उत्सवात देश-विदेशातील गणमान्य व्यक्तींचा सहभाग असेल. यामध्ये लेफ्टिनंट जनरल राणा प्रताप कलिता (माजी कमांडर, इंडियन आर्मी), के. व्ही. कार्तिक, कोयंबटूर (डेक्कन इंडस्ट्रीज), संजीव बजाज, बजाज फिनसर्व, पुणे, तसेच घाना, दक्षिण आफ्रिका, इंडोनेशिया, थायलंड, इंग्लंड, अमेरिका येथील विशिष्ट व्यक्तींना निमंत्रण देण्यात आले आहे, अशी माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी दिली.
देशभरात सध्या संघाच्या सुमारे ८३ हजार शाखा नियमितपणे कार्यरत आहेत. याखेरीज आठवड्यातून एकदा होणाऱ्या ३२ हजार बैठका आहेत. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त देशभरात विविध ठिकाणी हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले. या उपक्रमाच्या माध्यमातून हिंदू समाजात जागरूकता आणि सशक्तीकरण यावर भर दिला जाणार आहे.
नेपाळमधील झेंजी समाजाच्या हालचालींवर थेट भाष्य टाळत त्यांनी म्हटले की, हिंदू समाजाचे सशक्तीकरण हे केवळ भारतापुरते मर्यादित नाही, तर त्यामागे संपूर्ण जगाला दु:खातून मुक्त करण्याचा दृष्टिकोन आहे. जगभरात जे षड्यंत्र चालू आहे, त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी हिंदू समाज संघटित व सजग होणे आवश्यक आहे.