अकोला : राज्यात मुख्यमंत्री शब्द वापरून चक्क बनावट योजनेची अफवा पसरवल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अनाथ बालकांसाठी ‘मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना’ या नावाने राज्य शासनाची योजना असल्याचे भासवून समाज माध्यमांद्वारे संदेश प्रसारित केले जात आहेत. या अफवेमुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्यात या प्रकारची कुठलीही योजना अस्तित्वात नसून केवळ अफवा पसरवण्यात येत आहे. या योजनेच्या नावावर फसवणुकीला बळी पडू नये, असे महिला व बालविकास विभागाकडून स्पष्ट केले.
सध्याच्या डिजिटल युगात नागरिकांकडून समाज माध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. समाज माध्यमांवर माहितीची प्रचंड प्रमाणात देवाण-घेवाण होत असते. या माध्यमातून प्राप्त होणारी प्रत्येक माहिती ही सत्य असेलच असे नाही. समाज माध्यमांवरील माहितीची पडताळणी करूनच त्यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे. आता चक्क मुख्यमंत्री हा शब्द वापरून फसव्या योजनेची माहिती समाज माध्यमातून प्रसारित केल्या जात असल्याचा प्रकार समोर आला.
केंद्र शासनाच्या अनेक योजना पंतप्रधान, तर राज्यातील योजनांच्या सुरुवातीला मुख्यमंत्री शब्दाचा वापर करून योजनांना नावे दिली जातात. याचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना या नावाने खोट्या योजनेची माहिती प्रसारित करण्यात आली. या प्रकारच्या फसव्या संदेशांमध्ये ‘दि. १ मार्च २०२० नंतर दोन्ही पालक अथवा एक पालक मृत्यू झाला आहे व बालकांचे वय १८ वर्षे पेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील दोन मुलांना बाल सेवा योजनेत दरमहा चार हजार मिळणार आहेत व त्याचे अर्ज तहसील कार्यालयात उपलब्ध आहेत. सदर अर्ज भरून जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा परिवीक्षा अधिकारी यांच्याकडे सादर करावे’ असा मजकूर प्रसारित करण्यात येत आहे.
महिला व बाल विकास विभागाकडून मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना अशा नावाने कोणतीही योजना अस्तित्वात नसून हा संदेश केवळ अफवा आहे. त्यामुळे त्यावर विश्वास ठेवून आर्थिक नुकसान होणार नाही याबाबत दक्षता बाळगावी. अशा अफवा असलेल्या समाज माध्यमातील पोस्टवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी गिरीश पुसदकर यांनी केले आहे.
अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी इतर योजना
अनाथ किंवा एकल पालक बालकांसाठी महिला व बाल विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे सूचविले आहे.