अकोला : समृद्धी महामार्गावर धावत्या कंटेनरमधून २.४३ कोटींचे औषधे लंपास करणाऱ्या आंतरराज्य टोळीला वाशीम पोलिसांनी मोठ्या शिताफीने गजाआड केले. या टोळीने विविध राज्यात गुन्हे केले आहेत. टोळीला पकडण्यासाठी तब्बल ८५ हजार वाहनांची तपासणी पोलिसांनी केली.
भिवंडी येथून ॲबोट कंपनीच्या गोदामातून कंटेनरमध्ये (क्र.एमएच ०४ जेके ७०५४) औषधांचा माल नेण्यात येत होता. समृद्धी महामार्गावर धावत्या कंटेनरचे कुलूप तोडून दोन कोटी ४३ लाख ८६ हजार ६८४ रुपयांचे औषधे अज्ञात चोरट्यांनी लंपास केले होते. या प्रकरणी ३० जुलै रोजी कंपनी व्यवस्थापक मनोज कुमार यांच्या तक्रारीवरून कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस अधीक्षक अनुज तारे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा व सायबर शाखेकडे देण्यात आला. या प्रकरणी समृद्धी महामार्गावरून धावलेल्या ८५ हजार संशयित वाहनांची तपासणी केली.
भिवंडी, मुंबई, संभाजीनगर, मेहकर, मलकापूर, नागपूर आदी ठिकणी तपास करण्यात आला. दोन ट्रक संशयित म्हणून निष्पन्न झाले. तपासासाठी तीन पथक पुणे, नाशिक, भिवंडी तसेच मध्यप्रदेशमधील इंदोर, उजैन येथे दाखल झाले. संशयीत वाहन मध्यप्रदेशमधील असल्याची खात्री पटल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने गाडीवर पाळत ठेवली.
आरोपी पुन्हा गुन्हा करण्याच्या हेतूने ट्रक (क्र. एमपी ०९ एचएच ९८२९) घेऊन आले. वाशीम पोलिसांच्या पथकांनी पाठलाग करुन मोठ्या शिताफीने ट्रक अडवून त्याची झडती घेतली. ट्रकमधील संशयित आरोपी अरविंद अनाबसिंग चौहान, बुरा उर्फ कुलदीप भारत छाडी, कुनाल नरेश चौहान, अंतिम कल्याण सिसोदीया यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांनी मुख्य आरोपी राजेंद्र सादुलसिंग चौहान हा असल्याचे सांगितले. त्याला मध्य प्रदेशमधील देवास स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले.
गुन्ह्यात वापरण्यात आलेली मोटार देखील जप्त करण्यात आली. या टोळीने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह गोवा, कर्नाटक व गुजरात राज्यात गुन्हे केले आहेत. आरोपींकडून गुन्ह्यांत वापरलेला ३८ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्ह्यात चोरी गेलेल्या औषधांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक विविध ठिकाणी रवाना करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयाने १२ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. ही कारवाई पोलीस अधीक्षक अनुज तारे, अपर पोलीस अधीक्षक लता फड, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाडवी यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा, सायबर सेल व कारंजा ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.