नागपूर : दिवाळीच्या शाळांना सुट्या लागल्याने मुलांमध्ये आनंदी आहे. दिवसभर खेळणे हाच त्यांचा नित्यक्रम, अशाच प्रकारे क्रिकेट खेळताना एका १४ वर्षाच्या शाळकरी मुलाचा धक्कादायक मृत्यू झाला. नागपूर जिल्ह्यातील भिवापूरमध्ये ही घटना घडली. प्रणव अनिल आगलावे (वय १३, रा. भिवापूर) असे या मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

प्रणव हा स्थानिक राष्ट्रीय विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होता. दररोजप्रमाणेच गुरुवारी शाळा सुटल्यावर तो आपल्या मित्रांसोबत महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेट खेळायला गेला होता. खेळ सुरू असतानाच अचानक त्याच्या अवघड जागेवर बॅट लागली. या तीव्र धक्क्याने प्रणव क्षणातच जमिनीवर कोसळला.

मित्रांनी तात्काळ त्याला पाणी पाजण्याचा प्रयत्न केला, पण त्याची हालचाल थांबलेली पाहून सर्वजण घाबरले. त्यांनी तातडीने मदतीसाठी आरडाओरड केली. महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी धाव घेत प्रणवला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासल्यानंतर त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने रुग्णालयात जमा झाले आणि वातावरण शोकमग्न झाले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.

अवघड जागेवर गंभीर इजा

उपस्थित लोकांच्या माहितीनुसार, प्रणव खेळताना हातातील बॅट दोन पायांच्या मधोमध धरून दाबण्याचा प्रयत्न करत होता. त्याच वेळी अचानक झालेल्या आघाताने त्याच्या अवघड जागेवर गंभीर इजा झाली. या तीव्र वेदनेमुळे तो तात्काळ बेशुद्ध पडला आणि काही क्षणांतच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, महिनाभरापूर्वीच प्रणवच्या वडिलांचे निधन झाले होते. अजूनही त्या दुःखातून सावरायच्या आधीच नियतीने आईवर आणखी एक घाव केला आहे. एका आईचा आधार आणि एकुलता एक मुलगा क्षणात हिरावून घेतल्याने संपूर्ण भिवापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.