नागपूर: वन्यजीव आणि निसर्गाच्या संरक्षणाचे धडे विद्यार्थीदशेतच मिळावे म्हणून आता अनेक शाळा पुढाकार घेत आहेत. प्राणिसंग्रहालय आणि वनखात्याच्या आवाहनाला शाळा व्यवस्थापनाकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. वन्यप्राणी दत्तक योजना त्यासाठी एक चांगला मार्ग ठरला आहे. शहरातील नारायणा विद्यालयाने महाराजबाग प्राणिसंग्रहालयातील निलगाईला दत्तक घेतले आहे.

ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणिसंग्रहालय म्हणजे नागपूरकरांसाठी मोठे आकर्षणाचे केंद्र आहे. या प्राणिसंग्रहालयात वन्यप्राणी दत्तक योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत पहिल्यांदा एका अनिवासी भारतीयाने तर त्यानंतर दुसऱ्या वर्षी अभिनेता टायगर श्रॉफ याने वाघाला दत्तक घेतले. याअंतर्गत या प्राण्यांच्या वर्षभराच्या संपूर्ण खर्चाची जबाबदारी दत्तक घेणारी व्यक्ती उचलते. नारायणा विद्यालयाने वन्यजीवांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या प्रयत्नात नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांनी सलग आठव्या वर्षी पुन्हा एकदा नागपूरच्या महाराजबाग प्राणिसंग्रहालयातून निलगाईला दत्तक घेतले.

हेही वाचा >>> नागपूर: कारागृह पोलिसांचा ‘साइड बिझनेस’; १० ग्रॅम गांजासाठी ५ हजार तर १०० रुपये प्रतिमिनिट कॉलसाठी…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विद्यालयाचा हा प्रयत्न विद्यार्थ्यांच्या मनात वन्यजीव संरक्षण आणि संवर्धनाचे मूल्य पेरणारा आहे. महाराजबाग प्राणिसंग्रहालयाच्या अधिकाऱ्यांनी प्राचार्या रेखा नायर यांना या दयाळूपणाबद्दल कौतुक प्रमाणपत्र प्रदान केले. या दत्तक कार्यक्रमासाठी प्राणिसंग्रहालय नियंत्रक डॉ. काटकर, प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित मोटघरे, महेश पांडे, जय दरवडे व प्राणिसंग्रहालयातील कर्मचारी उपस्थित होते. पूनम करुणाकरन, पूजा शॉ, तितिक्षा सोनी आणि मोहन जोशी कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी काही विद्यार्थ्यांनी प्राण्यांच्या संवर्धनाच्या महत्त्वाबद्दल आपले मत व्यक्त केले.