अभिनेत्री आणि शिंदे गटाच्या समर्थक दीपाली सय्यद यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेंवर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. तसेच अजित पवारच स्त्रियांना मानसन्मान देत नसल्याचा आरोप केला. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळात महिलांना संधी नसल्याच्या मुद्द्यावरही भाष्य केलं. त्या जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमानिमित्त नागपुरात आल्या होत्या. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दीपाली सय्यद म्हणाली, “अजित पवारांनी नारायण राणे यांच्यावर टीका केली. त्यात त्यांनी ‘नारायण राणे हरले, एका बाईसमोर हरले एका बाईसमोर’ असं म्हटलं. बाईसमोर हा शब्द स्त्रियांना कितपत चांगला वाटेल. तुम्ही स्त्रियांना मानसन्मानच देत नाही. तुम्ही काय अपेक्षा ठेवत आहात. आज हे म्हणतात मंत्रिमंडळात स्त्री नाही, मग स्त्री दिसत नाही, तर का दिसत नाही. हे यांनी तपासलं पाहिजे.”

“तीनवर्षांपूर्वी महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा करू शकले नाहीत. कारण पुरुषप्रधान संस्कृतीसाठी, पुरुषांना मोठं करण्यासाठी महिलांना ते स्थान दिलं नाही. असं असेल तर हे पुढे काय काम करणार आहेत. या मोठ्या दिग्गज नेत्यांनी महिलांची ही स्थिती समजून घ्यावी,” असं मत दीपाली सय्यद यांनी व्यक्त केलं.

व्हिडीओ पाहा :

“‘समझनेवाले को इशारा काफी हैं’. हे व्हायला हवं. यांनी स्त्रियांना संधी दिली, तरच स्त्रिया मोठ्या होतील. त्यामुळे मी महाराष्ट्र महिला केसरीतील सर्वांना खूप शुभेच्छा देते”, असंही दीपाली सय्यद यांनी नमूद केलं.

हेही वाचा : Video: “अजितदादा म्हणजे कमाल की चीज, नेता असाच…”, ‘तो’ व्हिडीओ शेअर करत संजय राऊतांचा नारायण राणेंना टोला!

अजित पवारांचा नारायण राणेंना टोला!

संजय राऊतांनी ट्वीट केलेल्या व्हिडीओमध्ये अजित पवार नारायण राणेंविषयी खोचक शब्दांत टिप्पणी करताना दिसत आहेत. अजित पवारांनी नारायण राणेंच्या वांद्र्यातील पराभवाचाही संदर्भ देत त्यांचा पराभव एका महिलेने केल्याचं विधान केलं आहे. “नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले. राणे साहेब तर दोनदा पडले. एकदा कोकणात आणि एकदा मुंबईत पडले. तिथे तर त्यांना महिलेनं पाडलं. बाईनं पाडलं नारायण राणेंना”, असं अजित पवार या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहेत.

काय घडलं होतं वांद्रे पोटनिवडणुकीत?

२०१५ मध्ये शिवसेना आमदार बाळा सावंत यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या वांद्रे पूर्व मतदारसंघात शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना तिकीट दिलं. तेव्हा त्यांच्याविरुद्ध नारायण राणे यांनी मातोश्रीच्या अंगणात शिवसेनेला पराभूत करण्याची घोषणाच केली होती. मात्र, त्यांना २० हजार मतांनी तृप्ती सावंत यांच्याकडून पराभूत व्हावं लागलं होतं. यानंतर २०१९मध्ये मात्र शिवसेनेनं तृप्ती सावंत यांना उमेदवारी नाकारल्यामुळे सावंत यांनी बंडखोरी करत भाजपामध्ये प्रवेश केला. शिवसेनेने तिथे मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना उमेदवारी दिली होती. मात्र, काँग्रेसच्या झिशान सिद्दिकी यांनी त्यांचा पराभव केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shinde faction supporter actress deepali sayed comment on ajit pawar criticism of narayan rane rno news pbs
First published on: 09-03-2023 at 12:09 IST