नागपूर : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘हिंदू दहशतवाद’ या विषयावर केलेल्या वादग्रस्त विधानाचा निषेध करण्यासाठी नागपुरात शिवसेनेने (शिंदे गट) तीव्र आंदोलन केले. आमदार कृपाल तुमाने यांच्या नेतृत्वाखालील या आंदोलनात मोठ्या संख्येने शिवसैनिक सहभागी झाले होते.
पृथ्वीराज चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीवरील मुलाखतीत ‘हिंदू दहशतवादा’बद्दल विधान केले होते. या विधानामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा आरोप करत शिवसेनेने निषेध नोंदवला. नागपुरातील भांडे प्लॉट येथील आमदार कृपाल तुमाने यांच्या कार्यालयासमोर नागपूर जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्व प्रमुख कार्यकर्ते एकत्र आले शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत चव्हाण यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध केला. आंदोलकांनी चव्हाण यांच्या वक्तव्याचा निषेध करणारे फलक हातात घेतले होते. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.
आमदार कृपाल तुमाने म्हणाले, “पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेले विधान हे हिंदू समाजाचा अपमान करणारे आहे. अशा प्रकारची विधाने समाजात द्वेष निर्माण करतात. हिंदूविरोधी भूमिकेचे हे एक उदाहरण आहे. यावेळी शिवसैनिकांनी चव्हाण यांनी तात्काळ माफी मागावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा दिला.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार, विनोद सातंगे, युवा सेना सचिव शुभम नवले, युवा सेना जिल्हा प्रमुख निलेश तिघरे, महिला प्रमुख नेहा भोकरे, करुणा आष्टणकर, रुपराव गिरडे, सचिन पुडके महाराज, अजय बालपांडे, चंद्रशेखर बावनकुळे, योगेश पौनिकर, विक्रांत चाफले, रिना बांडेबुचे, सपना मेश्राम, हेमलता गिरडकर, महेश डडमल यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते. चव्हाण काय म्हणाले… भगवा, हिंदुत्व आणि सनातन एक नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे जेष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रत्युत्तर देत या विषयावर भाष्य केले. भगवा दहशतवाद हा शब्द वापरला, हा चुकिचाच होता. आजही तो वापरला जाऊ नये, अशी माझी भूमिका आहे. मी माझ्या सहकाऱ्यांना तसे सांगीतल देखील आहे. मात्र भगवा, हिंदुत्व आणि सनातन हे एक नाही. असेही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. मी मुख्यमंत्री असताना सनातन वरती बंदी आणण्याचा प्रस्ताव पाठवला होता. त्या संदर्भात माझ्या पोलिसांनी मला हजारो पानांचे पुरावे दिले होते. त्यामुळे हे एकच आहे याला माझा पुर्ण विरोध आहे. भाजप आणि आरएसएस आल्यानंतर भगवा आला का? असेही ते म्हणाले.