मध्यप्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर आणि सरताजसिंग यांना मंत्रिपदावरून डच्चू दिल्यानंतर गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडीच्या पाश्र्वभूमीवर मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह सहसरकार्यवाह भैयाजी जोशी, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे आणि संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेश सोनी यांच्याशी चर्चा केली.

वयाची पंचाहत्तरी पार केलेल्या ज्येष्ठ नेत्यांना सरकारमध्ये कुठलेही मंत्रीपद न देता त्यांनी मागदर्शक म्हणून काम करावे या केंद्र सरकारच्या धोरणानुसार मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री बाबुलाल गौर आणि सरताज सिंग या पक्षाच्या दोन वरिष्ठ नेत्यांना मंत्रिपदावरून हटविल्यानंतर गेल्या काही दिवसांपासून दोन्ही वरिष्ठ नेते मुख्यमंत्री शिवराजसिंह यांच्यावर नाराज होते. त्यामुळे पक्षातंर्गत राजकीय घडामोडी वाढल्या होत्या. दोन्ही नेत्यांनी संघाच्या ज्येष्ठ नेत्यांशी संपर्क साधला होता. या नेत्यांच्या संपर्कात मध्यप्रदेशचे काही काँग्रेस नेते असल्याची माहिती समोर आली होती. त्या पाश्र्वभूमीवर शिवराजसिंह चौहान बुधवारी दुपारी नागपुरात दाखल झाले. विमानतळावरून थेट रेशीमबागेतील स्मृती मंदिरात पोहोचले. त्यांनी सहसरकार्यवाह भैयाजी जोशी आणि सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांच्याशी जवळपास एक तास चर्चा केली. सुरेश सोनी यांच्याशी चर्चा केल्यानंतर ते महालातील संघ मुख्यालयात पोहोचले. तेथे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेऊन त्यांच्याशी जवळपास अर्धातास चर्चा केली, त्यानंतर ते भोपाळला रवाना झाले. शिवराजसिंह चौहान यापूर्वी मोहन भागवत आणि भैय्याजी जोशी यांना कुंभमेळ्याचे आमंत्रण देण्यासाठी आले होते. मात्र, मध्यप्रदेशच्या राजकीय उलथापालथीच्या पाश्र्वभूमीवर आजची त्यांची नागपूर भेट राजकीयदृष्टय़ा महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

राजकीय भेट नाही -चौहान

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना  शिवराजसिंह चौहान म्हणाले, आजही भेट कुठलीही राजकीय भेट नव्हती. नुकत्याच झालेल्या कुंभमेळ्यामध्ये ५१ विषयांवर विचार मांडण्यात आले, त्यावर काम करण्यासंदर्भात संघाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात आली आहे. मध्यप्रदेशमध्ये कुठल्याच नेत्यांची नाराजी नाही. बाबुलाल गौर आणि सरताजसिंग पक्षाचे ज्येष्ठ नेते असून त्यांची काहीच नाराजी  नाही. या विषयावर संघाच्या ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यात नाही.