नागपूर : दिपावलीचा सण आटोपताच शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढल आहे. कायदा आणि पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नसलेल्या गुंडांमुळे दिपावलीच्या दुसऱ्याच दिवशी उपराजधानी शनिवारी रात्री हादरून गेली. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत खून आणि अल्पवयीन मुलीवरच्या सामुहिक अत्याचाराने शहरातल्या कायदा व सुव्यवस्थेला हादरे दिले.

अल्पवयीन मुलीवरच्या सामुहिक अत्याचाराची घटना बिडगावच्या लॉजवर घडली. तर खूनाच्या घटनेने कपीलनगरचा परिसर हादरून गेला. रस्त्याने जात असताना कारचा धक्का लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून ई रिक्षा चालकाने एकाचा खून केला.

राजेश्वर इश्वर ओरेकर (४८) हे शनिवारी रात्री कारने कपीलनगरातल्या पाण्याच्या टाकीजवळील म्हाडा कॉलनीतून जात होते. यावेळी त्यांची एका ई रिक्षाला धडक बसली. यावरून इ रिक्षा चालकाने आधी त्यांच्याशी वाद घातला. त्याने आपल्या आणखी काही साथीदारांना फोन करून घटनास्थळी बोलावले. यासर्वांनी मिळून राजेश्वरवर चाकू हल्ला करीत त्यांना जीवानिशी मारले. मृतक राजेश्वर हे कुख्यात उके याचे साळे असल्याची माहिती मिळत आहे. पोलिसांनी या प्रकरणात हनी ठाकूर आणि कल्पेश या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.

शाळकरी मुलीवर सामुहिक अत्याचार

१२ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार आणि अपहरणाचा हा क्रूर प्रकार बिडगाव येथील एका लॉजवर उघडकीस आला. पीडितेवर अत्याचार केल्यानंतर, आरोपीने तिचा अश्लील व्हिडिओ बनवून तो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी दिली. पोलिसांनी या प्रकरणात अत्याचार करणाऱ्याला अटक केली आहे, तर त्याच्या साथीदाराचा शोध सुरू आहे.

नंदनवन पोलीस हद्दीतली एक १२ वर्षीय शाळकरी मुलगी २३ ऑक्टोबरला काही वस्तू आणण्यासाठी बाजारात गेली होती. यावेळी करण रामटेके (२१) आणि त्याचा साथीदार रोहित या दोघांनी तिला वाटेत थांबवले, तिचे तोंड दाबून तिला जबरदस्तीने बीडगाव येथील एका लॉजवर नेले. लॉजमधील एका खोलीत करण रामटेके यांनी पीडितेशी मुलीच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले आणि नखांनी तिचे शरीर ओरबाडले. त्याचा साथीदार रोहित याने संपूर्ण घटनेत त्याला मदत केली. या क्रूरतेनंतर आरोपींनी भ्रमणदूरध्वनीवर पीडितेचा आक्षेपार्ह व्हिडिओ बनवला. त्यांनी मुलीला याची वाच्यता केली तर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर दोघेही मुलीला लॉजवर सोडून पसार झाले.

कसेबसे घर गाठत मुलीने कुटुंबाला या घटनेची माहिती दिली. कुटुंबाने लगेच नंदनवन पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून करण रामटेके याला अटक केली. पोलिसांनी ताब्यात घेतलेला करण याला गुन्हेगारी इतिहास आहे. त्याच्यावर यापूर्वीही गुन्हे दाखल आहेत. करणचा साथीदार रोहित फरार असून पोलिस त्याच्या मागावर आहेत. पोलिसांनी या प्रकरणात लैंगिक अत्याचार, बलात्कार, अपहरण, धमकी आणि बाल अत्याचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.