महेश बोकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यात लोकसंख्या वाढल्याने सार्वजनिक प्रवासी वाहतुकीसाठी ‘एसटी’च्या बसेस वाढणे आवश्यक आहे. करोना काळात ‘एसटी’च्या सुमारे २ हजार बसेस भंगार (स्क्रॅप) झाल्या असताना त्या तुलनेत नवीन बस मिळाल्या नाहीत. त्यामुळे राज्यात बसेसच्या तुटवडय़ाने लांब पल्ल्याच्या प्रवासी फेऱ्यांवर परिणाम झाला आहे. त्यातच १५ वर्षांवरील वाहने आता एसटीत वापरली जाणार नसल्याने महामंडळाच्या बसेस तुटवडय़ाच्या अडचणी वाढणार आहे.

एसटी महामंडळात तीन वर्षांपूर्वी १७ हजार ५०० प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसेस होत्या. करोना काळात ‘एसटी’च्या प्रवासी फेऱ्या जवळपास ठप्प पडल्या. तर करोना काळात कर्मचारी संपासह इतर कारणाने एसटीची आर्थिक घडीत विस्कटली. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर होत नाही. ‘एसटी’ला करोना काळात सलग दोन वर्षे नवीन बसेस घेता आल्या नाहीत. तर दुसरीकडे आवश्यक किलोमीटर धावण्यासह बसेसची मुदत पूर्ण होणे, बसेस भंगार झाल्याने या काळात सुमारे २ हजार बसेस ‘स्क्रॅप’ करण्यात आल्या. त्यामुळे ‘एसटी’च्या राज्यभरातील सगळय़ाच ३१ विभागांत बसेसचा तुटवडा आहे.

दरम्यान, एसटीवर नियमित विद्यार्थ्यांची वाहतूक, विविध कार्यालयात ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहतुकसह मागास व आदिवासी पाडय़ांतही नित्याने प्रवासी वाहतूक करण्याची जबाबदारी आहे. बसेसच्या तुटवडय़ामुळे ‘एसटी’च्या राज्यातील अनेक विभागातील लांब पल्ल्याच्या फेऱ्या कमी करणे वा बंदही करण्यात आल्या आहे. निश्चितच त्यामुळे प्रवाशांना फटका बसत आहे.

‘एसटी’ने केंद्र सरकारच्या कायद्याप्रमाने आता १५ वर्षांवरील बसेस न वापरण्याचे ठरवले आहे. या बसेसची संख्या महामंडळात खूपच कमी असल्याचा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दावा आहे. परंतु, थोडय़ाच का होईना, या बसेसही सेवेतून निघाल्यावर आणखी बसेस कमी होऊन ‘एसटी’च्या प्रवासी वा मालवाहतूक सेवेवर त्याचा परिणाम होणार आहे. राज्यात सध्या ‘एसटी’कडे १५ हजार ५०० प्रवासी बसेस आणि १ हजार १०० मालवाहू बसेस आहेत, हे विशेष.

एसटी महामंडळाच्या दोन हजार बसेस कमी झाल्या असल्या तरी नवीन बसेस घेण्याची प्रक्रिया गतिमान करण्यात आली आहे. त्याअंतर्गत ७०० नवीन बसेस आल्या असून आणखी २ हजार बसेस मिळणार आहे. ५०० बसेस भाडय़ाने घेण्यात येणार असून त्यानंतर २ हजार ४०० आणखी बसेस घेण्याचे नियोजन आहे.- शेखर चन्ने, उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ, मुंबई</strong>

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shortage of buses in st effects on long distance trips amy
First published on: 02-03-2023 at 00:44 IST