नागपूर : कर चोरी आणि आर्थिक अनियमितता प्रकरणात प्राप्तिकर विभागाने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी रायसोनी शिक्षण समुहाची उपकंपनी असलेल्या श्रद्धा एआय टेक्नॉलॉजिज प्रायव्हेट लिमिटेडवरील छापा कायम ठेवत कारवाई केली. बॉम्बे आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध (लिस्टेड) असलेल्या या कंपनीचे प्रवर्तक सुनील ज्ञानचंद रायसोनी आहेत.

मंगळवारी सकाळी सुरू झालेली ही कारवाई बुधवारीदेखील सुरू होती. प्राप्तिकर विभागाच्या मुंबई येथील अधिकाऱ्यांद्वारे ही कारवाई केली जात आहे. यासाठी नागपूर प्राप्तीकर विभागाच्या अधिकाऱ्यांची मदत घेण्यात आली आहे. नितीन खारा संचालित कॉन्फिडन्स पेट्रोलियम इंडिया लिमिटेडपाठापोठ होत असलेली ही कारवाई मोठ्या उद्योजकांमध्ये धडकी भरविणारी ठरत असल्याची माहिती आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातली श्रद्धा एआय ही रायसोनी समुहाची उपकंपनी आहे. तिने सादर केलेल्या वार्षिक ताळेबंदात अनियमितता आढळल्याने ही प्राप्तिकर विभागाने ही कारवाई केल्याची माहिती मिळत असून पथकाने या संदर्भात काही कागदपत्रेही सील केल्याची माहिती मिळत आहे.

प्राप्तिकर विभाग एक्टिव्ह मोडवर

कर चोरी प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून प्राप्तिकर विभाग सक्रिय झाला आहे. विभागाने आठवडा भरात आधी पेट्रोलियम क्षेत्रातील गो गॅस कंपनीचे संचालक नितीन खारा यांच्या कार्यालयावर छापा टाकला होता. विभागाच्या गुन्हे अन्वेषण शाखेने (आय अँड सी. आय.) सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास खामला येथील उप निबंधक कार्यालयात छापा टाकला होता. रात्री उशीरापर्यंत ही कारवाई चालली. त्यापूर्वी याच प्रकरणात विभागाने काही दिवसांपूर्वी सिव्हिल लाईन्स आणि रेशिमबाग येथील उप निबंधक कार्यालयातही झडती घेतली होती. एन दिवाळीच्या सणात सुरू असलेल्या या कारवाईमुळे कर चुकवणाऱ्या उद्योजकांचे धाबे दणाणले आहेत.