गडचिरोली : महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकावर वसलेल्या आणि विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर राहिलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम सिरोंचा तालुक्यात आता विकासाच्या नव्या पर्वाला सुरुवात होत आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून आणि राणा शिपिंग कंपनीचे संचालक राणा सूर्यवंशी यांच्या पुढाकारातून सिरोंचा-अंकीसा राष्ट्रीय महामार्गावरील राजेश्वरपल्ली येथे तब्बल १४६८ गुंतवणूक कोटींच्या गुंतवणुकीतून भव्य वैद्यकीय आणि शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन शनिवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. सोबतच अहेरी येथील महिला रुग्णालयाचे उद्घाटन देखील मुख्यमंत्री करणार आहेत.
महाराष्ट्र, तेलंगणा आणि छत्तीसगड या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेला हा भाग आरोग्य आणि उच्च शिक्षणाच्या सुविधांपासून वर्षानुवर्षे वंचित होता. साध्या शस्त्रक्रियेसाठी किंवा प्रसूतीसाठीही येथील नागरिकांना २५० ते ४०० किलोमीटर दूरवर असलेल्या हैदराबाद, नागपूर, चंद्रपूर किंवा गडचिरोली येथे जावे लागत होते. वेळेवर उपचार न मिळाल्याने अनेकांना प्राण गमावावे लागले. मात्र, या नव्या प्रकल्पामुळे ही परवड थांबणार आहे.
२६४ एकर जागेवर साकारत असलेल्या या संकुलात पुण्यातील रुबी रुग्णालयाच्या धर्तीवर ३०० खाटांचे अत्याधुनिक मल्टीस्पेशालिटी रुग्णालय उभारले जाणार आहे. यात बाह्यरुग्ण विभाग, अस्थिरोग, कर्करोग उपचार तसेच विविध प्रकारच्या जटिल शस्त्रक्रियांची सोय उपलब्ध होईल. राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध आरोग्य योजनांचा लाभही येथे घेता येणार आहे.
याच संकुलात वैद्यकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि नर्सिंग कॉलेजसह विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांची सुविधा उपलब्ध होणार आहे. या शैक्षणिक संकुलाचे वैशिष्ट्य म्हणजे, यात आदिवासी विद्यार्थ्यांना ७५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहेत. तसेच, स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वाचनालय, मोफत मार्गदर्शन आणि वसतिगृहाची व्यवस्थाही केली जाणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या या भूमिपूजन कार्यक्रमास राणा सूर्यवंशी यांच्यासह रुबी हॉस्पिटलचे संचालक डॉ. परवेझ ग्रँट हेदेखील उपस्थित राहणार आहेत. या प्रकल्पामुळे केवळ सिरोंचाच नव्हे, तर लगतच्या छत्तीसगड आणि तेलंगणातील सीमावर्ती भागातील आदिवासी जनतेच्या जीवनात आरोग्य आणि शिक्षणाच्या बाबतीत मोठी कलाटणी मिळण्याची अपेक्षा आहे.
