लोकसत्ता वार्ताहर

बुलढाणा : सहा वर्षांपूर्वी बुलढाण्यात जंगी मोर्चा निघाला होता. यानंतर आता बुलढाण्यात १३ सप्टेंबरला सकल मराठा समाजाच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘तो’ मोर्चा मूक होता मात्र यंदाच्या मोर्च्यात गगनभेदी घोषणा देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील १३ तालुक्यात उपोषण, निवेदन देऊन मोर्च्याला पाठबळ देतांनाच वातावरण निर्मिती करण्यात येत आहे.

मागील वेळी निघालेला क्रांती मोर्चा पूर्णतः मूक होता. मागण्यांसाठी समाजिक सागर उसळला मात्र एक घोषणा देखील दिली गेली नाही. मूक राहून समाज हुंकार भरत होता. समन्वय समितीने बुधवारच्या मोर्च्यासाठीच्या घोषणा निर्धारित केल्या आहे. एक मराठा लाख मराठा या बहुचर्चित घोषणेला यंदा ‘जय जिजाऊ, ‘जय शिवराय’ या मुख्य घोषणेची जोड राहणार आहे. याशिवाय ‘आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं’, “मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे’, ‘अंतरवाली घटनेचा तीव्र निषेध’ या घोषणाही देण्यात येणार आहे.

आणखी वाचा-मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास विरोध, नागपुरात आंदोलन सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जिल्ह्याच्या सर्वच भागातून मोर्चेकरी येणार असल्याने ठिकठिकाणी ‘पार्किंग’ ची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. अजिंठा धाड रोडवरून येणाऱ्यांसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती, मोताळा- मलकापूर मार्गाने येणाऱ्यांसाठी गुलाबचंद नगर तसेच चिखली मेहकर वरून येणाऱ्यांसाठी जिजामाता महाविद्यालय व शासकीय डीएड कॉलेजच्या प्रांगणात पार्किंग राहणार आहे. शहरातील लोकांसाठी कवीदीप हॉस्पिटल जवळ व्यवस्था उभी करण्यात आली आहे.