नागपूर : स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कार्पोरेट सॅलरी पॅकेज (सीएसपी) योजनेंतर्गत खाते असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयांच्या अपघाती विम्याचे कवच मिळणार आहे. त्याबाबत महामंडळाचा स्टेट बँकेसोबत सामंजस्य करार झाला असून त्याबाबतचे परिपत्रक सर्व विभाग नियंत्रक कार्यालयांना प्राप्त झाले आहेत.
एसटी महामंडळात सुमारे ९२ हजार अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत. त्यापैकी ८० ते ८५ टक्के जणांचे वेतन स्टेट बँकेतून होते. कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून सातत्याने अपघाती विमा योजनेची मागणी केली जात होती. त्यानुसार स्टेट बँकेने सकारात्मकता दर्शवल्यावर महामंडळाने सामंजस्य करार केला. अपघाती मृत्यू वा अपंगत्व येणाऱ्या कर्मचाऱ्यांना १ कोटी रुपयाचा अपघाती विमा दिला जाणार आहे.
योजनेनुसार कर्तव्यावर असो अथवा नसो अधिकारी-कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास योजनेचा लाभ मिळेल. इतर कारणांनी मृत्यू झाल्यास ६ लाख रुपयापर्यंतचा ग्रुप टर्म विमा अनुज्ञेय राहील. सी.एस.पी. खात्यातील पैशातून तिकीट घेऊन विमानाने प्रवास करताना अपघाती मृत्यू झाल्यास हवाई विमा अनुज्ञेय राहील. इतरही अनेक अटी व शर्थी करारात असून या कराराची प्रत प्रत्येक विभागातील एसटी अधिकाऱ्यांना संबंधित शाखेत नेऊन द्यावी लागणार आहे. या वृत्ताला एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाने दुजोरा दिला.
सहकारी बँक धोक्यात येणार
एसटी महामंडळातील ८० ते ८५ टक्के अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन खाते स्टेट बँकेत तर इतर १५ ते २० टक्के कर्मचाऱ्यांचे खाते स्टेट ट्रांसपोर्ट को-ऑ परेटिव्ह बँकेत आहे. या नवीन योजनेमुळे बहुतांश कर्मचारी स्टेट बँकेत खाते उघडणार असल्याने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेची अडचण वाढणार आहे. त्यामुळे एसटीने कष्टाने उभी केलेली बँक वाचवण्यासाठी राज्य शासनाने या बँकेत गुंतवणूक करण्याची मागणी एस.टी. कामगार संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अजय हट्टेवार यांनी केली आहे.
सध्या केवळ एक लाखाचीच मदत
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (एसटी महामंडळ) आतापर्यंत अपघाती विमा योजना नव्हती. त्यामुळे योजनेचा लाभ मिळण्याचा प्रश्नच नव्हता. परंतु महामंडळाकडून त्यांच्या स्तरावर एसटी कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास केवळ एक लाख रुपयांची आर्थिक मदत केली जात होती. परंतु नवीन सामंजस्य करारामुळे एसटी कामगारांना मोठा दिलासा मिळणार आहे.