चंद्रपूर : राज्याचे माजी सांस्कृतिक कार्य मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या दूरदृष्टीपूर्ण प्रस्तावाला जागतिक पातळीवर मान्यता मिळाली. रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत समावेश झाला. यासाठी मुनगंटीवार यांनी पुढाकार घेत प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावास ‘युनेस्को’ने मंजुरी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील एक, अशा एकूण १२ किल्ल्यांचा समावेश ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला. या ऐतिहासिक निर्णयासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले असून, हा निर्णय मुनगंटीवार यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांप्रती असलेल्या निस्सीम श्रद्धेचे फलित असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
शिवरायांच्या शौर्य, कर्तृत्व आणि पराक्रमाने पावन झालेल्या महाराष्ट्राच्या भूमीवर महाराजांनी बांधलेल्या व त्यांचे वास्तव्य असलेल्या किल्ल्यांना जागतिक ओळख मिळावी, यादृष्टीने आमदार मुनगंटीवार यांनी प्रस्ताव पाठवला होता. सांस्कृतिक कार्य मंत्री असताना त्यांनी ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ या संकल्पनेअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’च्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट करावे, अशी मागणी प्रस्तावाद्वारे केली होती. या प्रस्तावावर ‘युनेस्को’ने मोहोर उमटवत सर्व १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश केला.
या ऐतिहासिक निर्णयासाठी मुनगंटीवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि भारतीय पुरातत्व खात्याचे आभार मानले. यामध्ये महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या किल्ल्यांचा तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्यांचा समावेश आहे.
‘युनेस्को’ची यादी जाहीर झाल्यानंतर आमदार मुनगंटीवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी, त्यांचे कार्यकर्तृत्व जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याच्या भावनेने मी हा प्रस्ताव पाठवला होता. आज त्याचे फलित पाहून मन अभिमानाने भरून आले आहे. छत्रपतींनी रयतेसाठी अर्पण केलेले स्वराज्य वैभव संवर्धित करण्यासाठी मला खारीचा वाटा उचलता आला, याचे आत्मिक समाधान आहे. त्यांच्या विचारांचे पाईक होऊन शेवटच्या श्वासापर्यंत हे ईश्वरीय कार्य करत राहील, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षाचा उत्सव ऐतिहासिक
यानिमित्ताने मुनगंटीवार यांच्या कार्यशैलीवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. त्यांनी घेतलेल्या अनेक निर्णयांमुळे ऐतिसाहिक वारसा आणि परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीने सरकारने पाऊल टाकले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करताना सांस्कृतिक कार्यक्रमांसह ऐतिहासिक परंपरेचे जतन करण्याच्या दृष्टीनेदेखील त्यांनी पुढाकार घेतला होता.
महाराजांची वाघनखे भारतात, अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण निर्मुलन
महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा बाहेर काढला ती वाघनखे ब्रिटनच्या संग्रहालयातून भारतात आणण्यात आली असून ही वाघनखे दर्शनासाठी उपलब्ध आहेत. २९ जुलै १९५३ नंतर पहिल्यांदा अफजलखानाच्या कबरीचे अतिक्रमण हटवण्यात आले. हा धाडसी निर्णय घेऊन त्यावर अंमलबजावणी करण्याचे कामही मुनगंटीवार यांच्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातच झाले, हे विशेष.