वर्धा : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातील एक राजा फारसा परिचित झाला नाही. या घराण्यातील एक फांदी तब्बल ४०० वर्षांपासून महाराष्ट्राबाहेर थेट तामिळनाडूच्या तंजावर संस्थानावर राज्य करीत होती. हा राजा म्हणजे सरफॊजीराजे भोसले होय. शिवाजी महाराज यांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावरमध्ये मराठा सम्राज्याची स्थापना केली होती. याच घराण्यात सरफॊजीराजे दुसरे हे कर्तबगार म्हणून प्रसिद्ध पावले.त्यांनी मोठे ग्रंथालय स्थापन केले. त्यात आज ३० हजारपेक्षा अधिक पुस्तके आहे. आता हा राजवाडा व ग्रंथालय नव्या उपक्रमाने उजळणार आहे.
येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठातील विभागप्रमुख डॉ. सतीश पावडे यांनी याबाबत माहिती दिली. संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद, मराठा सेवा संघ, सरस्वती महाल तंजावर यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त तंजावरच्या राजवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, चर्चासत्रे आदी कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. तंजावूरच्या भोसले राजांच्या राजवाड्यात संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती समारंभ
मराठा सेवा संघ, संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय सांस्कृतिक परिषद, जिजाऊ ब्रिगेड आणि सरस्वती महल ग्रंथालय तंजावूर यांच्या संयुक्त विद्यमाने संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या १०५ व्या पुण्यतिथीनिमित्त तंजावूरच्या राजवाड्यात सांस्कृतिक कार्यक्रम, व्याख्यान, चर्चासत्र आदी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. परिषदेचे अध्यक्ष असलेले डॉ. सतीश पावडे म्हणाले की तंजावर घराण्याचे वंशज छत्रपती बाबाजीराजे भोसले, छत्रपती शिवाजीराजे भोसले, कोल्हापूर घराण्याचे वंशज छत्रपती संभाजीराजे भोसले, कर्नाटक विधान परिषदेचे सदस्य ए. एम. जी. मूळे, जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. निर्मला पाटील, मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. सोपान क्षीरसागर, सुनील महाजन, प्रमोद महाजन, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे परफॉर्मिंग आर्ट्स विभागाचे विभाग प्रमुख डॉ. भोजराज चौधरी, छत्तीसगड प्रदेश सचिव देवेंद्रराव वसिंग, राष्ट्रीय कार्याध्यक्ष अॅड. नंदकुमार वानखेडे तसेच विविध क्षेत्रांतील इतर मान्यवर या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत.
मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर तसेच राष्ट्रीय अध्यक्ष कामाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या स्मृती समारंभाच्या यशासाठी रामचंद्र केसकर गोस्वामी, उज्ज्वलदीप गाडेराव, विजय पाटील, पोपटराव सूर्यवंशी, विश्वजीत गाडेराव यांच्यासह संगीतसूर्य केशवराव भोसले सांस्कृतिक परिषदेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत.छत्रपती घराण्याच्या विद्वानांना ज्ञात असलेल्या जवळपास तीस भाषा, तीस हजारांहून अधिक ग्रंथसंपदा आणि यशस्वीरीत्या केलेल्या हजारो मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्रदानाचे कार्य – या सर्वांच्या माध्यमातून तंजावूरच्या राजांचे कार्य व विचार उजागर करून हा गौरवशाली इतिहास विश्वभर पोहोचविण्यासाठी हा कार्यक्रम अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.