नागपूर : औरंगजेबाच्या कबीरवरून सत्ताधाऱ्यांनी वाद पेटवला. त्यातून नागपूरात दंगल झाली. नागपूरमध्ये सर्व समाज एकत्र नांदत असताना ठरवून वातावरण खराब करण्यात आले. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. दोन समाजातील दरी मिटवण्यासाठी सदभावना रॅली काढण्यात येणार आहे, असे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
बुधवारी नागपूरमध्ये संविधान निर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना दीक्षाभूमी येथे अभिवादन करून या रॅलीची सुरुवात होणार आहे. नागपूरमध्ये शांतता नांदावी, सर्व धर्म पंथातील लोकांमध्ये विश्वासाची भावना निर्माण व्हावी, अशांत नागपूर शांत व्हावे म्हणून या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे, असे वडेट्टीवार म्हणाले.
महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली तेव्हा सरकारची बुद्धी भ्रष्ट झाली होती का? संजय गांधी निराधार योजनेतील महिलांना लाडक्या बहिणी योजनेचे फक्त ५०० रुपये देणार हे दुर्दैव आहे, ही महिलांची फसवणूक आहे. निवडणूक असताना मतांसाठी महिलाना सरसकट पैसे दिले, आता मात्र तिजोरीवरचा ताण कमी करण्यासाठी अशा क्लृप्त्या लढवणे हे महायुती सरकारचे पाप आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
विदर्भात पाणी टंचाई
विदर्भात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणावर आहे. मुंबई, मराठवाड्याला देखील फटका बसत आहे. वैनगंगा नदी कोरडी पडली आहे, काँग्रेसने आंदोलन केल्यावर फक्त एक टीएमसी पाणी सोडण्यात आले ते पुरेसे नाही आहे. गडचिरोली, चंद्रपूर, मेळघाट, यवतमाळ, वर्ध्यातही काही भागात पाणी टंचाईच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकारने याबाबत आढावा घेऊन पावले उचलावी. गरज पडली तर टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.