नागपूर : महाराष्ट्रातील सर्वाधिक वाघ विदर्भात असले तरीही वाघांच्या मृत्यूचा आलेखसुद्धा तेवढ्याच वेगाने वर जात आहे. गोंदिया वनक्षेत्रात शनिवारी कुजलेल्या अवस्थेतील वाघाचा मृतदेह आढळून आला. तर यापूर्वी नागपूर शहरालगत तसेच भंडारा वनक्षेत्रातही वाघाचा मृत्यू झाला असून अवघ्या दहा दिवसात विदर्भात तीन वाघ मृत्यूमुखी पडले आहेत.
२१ मार्चला नागपूर शहरापासन अवघ्या १८ किलोमीटर अंतरावर जामठा या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमजवळ रुई या गावात वाघाचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. या वाघाच्या डोक्यावर मार होता तर पोटाजवळही लागले होते. त्याची दोन नखे देखील गायब होती. हा वाघ रस्ते अपघातात मृत्युमुखी पडला हे स्पष्टपणे दिसत असूनही खात्याने नैसर्गिक मृत्यूची नोंद केली. तर त्यानंतर २७ मार्चला भंडारा वनविभागाअंतर्गत लेंडेझरी वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक ४९ मध्ये वाघाचा मृतदेह आढळून आला. त्याचेही सर्व अवयव शाबूत होते.
हेही वाचा…भंडारा : वैमनस्यातून तरुणाची हत्या; पेट्रोल टाकून जाळला मृतदेह…..
मात्र, डोक्याला आणि मागच्या पायाला जखम होती. येथेही नैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तर आता गोंदिया वनविभागात दक्षिण देवरी वनक्षेत्रात पालांदूर वनक्षेत्राजवळ वाघाचा अर्धवट कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. वनखात्याची चमू घटनास्थळी रवाना झाली असून त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल. या तीनही घटनांपैकी एका घटनेत वाघ पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत होता, तर एका घटनेत तो अर्धवट कुजलेल्या अवस्थेत होता. त्यावरुन वाघाचे मृत्यू हे दहा दिवसांपूर्वीचे असतानाही वनखात्याला त्याची भनकही लागली नाही. त्यामुळे पुन्हा एकदा गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.