नागपूर: शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर विदर्भातील चारपैकी तीन आमदार आणि खासदार भावना गवळी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असले तरी इतर खासदार आणि विधान परिषद सदस्य आणि माजी आमदार मात्र पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत.

विदर्भात शिवसेनेचे पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले चार आमदार असून ते सर्व पश्चिम विदर्भातील आहेत. यात यवतमाळ जिल्ह्यातील संजय राठोड (दिग्रस), बुलढाणा जिल्ह्यातील संजय रायमूलकर (बुलढाणा), संजय गायकवाड (मेहकर) व अकोला जिल्ह्यातील नितीन देशमुख (बाळापूर) यांचा समावेश आहे. यापैकी नितीन देशमुख वगळता तिघे एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. नितीन देशमुख यांनी आपण उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असल्याचे सांगितले. आशीष जयस्वाल (रामटेक) आणि नरेंद्र भोंडेकर (भंडारा शहर) हे दोघे अपक्ष आमदार आहेत. दोघेही पूर्वाश्रमीचे शिवसैनिक असून दोघेही एकनाथ शिंदेंबरोबर आहेत. विदर्भात सेनेचे तीन खासदार आहेत. भावना गवळी (यवतमाळ), प्रतापराव जाधव (बुलढाणा) आणि कृपाल तुमाने (रामटेक) यांचा समावेश आहे. अमरावतीची माजी खासदारव्दयी अनंत गुढे  आणि आनंदराव अडसूळ आणि माजी खासदार प्रकाश जाधव तसेच विधान परिषद सदस्य व नागपूरचे संपर्क प्रमुख दृष्यंत चतुर्वेदी  आणि माजी  आमदार व सेनेचे ज्येष्ठ नेते गोपीचंद बाजोरिया हे सुद्धा उद्धव ठाकरेंबरोबर आहेत. बंडाळीनंतर जिल्हापातळीवर शिवसैनिकांमध्ये अस्थिरता वाढली असली तरी त्यांची निष्ठा अजूनही ्न‘मातोश्री’वर कायम आहे.

भावना गवळींचेही शिंदे यांच्या निर्णयाला समर्थन

यवतमाळ शिवसेनेच्या यवतमाळ-वाशिमच्या खासदार भावना गवळी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदूत्वाच्या मुद्दय़ावर एकनाथ शिंदे यांच्या निर्णयावर विचार करण्याचे भावनिक आवाहन करणारे पत्र लिहिले आहे. एकनाथ शिंदे यांच्या हिंदूत्वाच्या मुद्यावर विचार करण्याची विनंती भावना गवळी यांनी पत्राद्वारे केली आहे. शिवाय शिवसेनेच्या या मावळय़ांवर कोणतीही कार्यवाही करू नये, असे आर्जवही केले आहे.