नागपूर : काही असामाजिक तत्त्वांनी वसंतराव नाईक झोपडपट्टी परिसरातील पोलीस चौकीसमोर उभ्या पोलिसांच्या ३ वाहनांना आग लावली. यात तिन्ही वाहन पूर्णत: जळाली. आरोपींनी चक्क पोलिसांची वाहने जाळल्यामुळे सामान्य नागरिकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसंतराव नाईक झोपडपट्टी यापूर्वी भुरू हत्याकांडावरून चर्चेत राहिली आहे. भुरू हत्याकांडानंतर परिसरात पोलीस चौकी उघडण्यात आली. अधिकारी आणि कर्मचारी येथूनच गस्तीवर निघतात. सीताबर्डी पोलीस ठाण्यात तैनात पोलीस कर्मचारी श्याम पांडे, मोहन पराडकर आणि दिगंबर भोयर यांची शनिवारी कर्तव्यावर हजर होते. तिघांनीही त्यांचे वाहन चौकीसमोर ठेवले आणि सरकारी वाहनांनी गस्तीवर निघाले.

हेही वाचा >>>नागपूर : पत्नीच्या जाचाला कंटाळून पतीची आत्महत्या

रात्री २ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी चौकीसमोर उभ्या तिन्ही वाहनांना आग लावली. एका व्यक्तीने नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली. बीटवर निघालेले पोलीस चौकीत परतले. तोपर्यंत तिन्ही वाहनांनी चांगलीच आग पकडली होती. दरम्यान, अग्निशमन विभागाचे एक पथकही घटनास्थळावर पोहोचले. पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. मात्र, तोपर्यंत तिन्ही वाहन पूर्णत: जळाले होते. कोणीतरी जाणीवपूर्वक ही आग लावली आहे. पोलीस चौकीसमोर पोलिसांचेच वाहन उभे असतात याची माहिती परिसरातील सर्वांनाच आहे. त्यानंतरही आरोपींनी पोलिसांची वाहने जाळली हे आश्चर्यकारक आहे. सध्या आरोपींवर गुन्हा नोंदवून त्यांचा शोध घेतला जात आहे, अशी माहिती सीताबर्डी ठाण्याचे दुय्यम पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी दिली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Three vehicles belonging to cops set on fire by unidentified accused in nagpur zws
First published on: 07-11-2022 at 09:26 IST