महेश बोकडे

नागपूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) तीन किंवा त्याहून अधिक वेळा धावत्या बसमध्ये प्रवाशांना तिकीट न देण्याच्या प्रकरणात वाहकाची चौकशीशिवाय बदली न करण्याचा निर्णय घेतला आहे. पूर्वी अशा प्रकरणात वाहकाची थेट बदली होत होती.एसटी महामंडळाकडे अशा प्रकारची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. या प्रकरणात वाहकावरील कारवाईत नेहमीच विविध कामगार संघटना व कामगारांकडून प्रश्न उपस्थित केले जातात. गर्दीमुळे वाहकाने पैसे घेतले नाही आणि वेळेत तिकीटही दिले नाही, तर तो दोषी कसा, असा कामगार संघटनांचा प्रश्न होता. त्यामुळे महामंडळाने अशा प्रकरणात विभाग नियंत्रक, विभागीय वाहतूक अधीक्षक, विभागीय कर्मचारी, अधिकारी यांच्या तीन सदस्यीय समितीकडून चौकशीचा निर्णय घेतला आहे. ही समिती बसची आसन क्षमता, उभे व बसलेले प्रवासी, वाहकाचे उत्पन्न, या बाबी विचारात घेऊन अहवाल देईल. समितीचे मत बदलीबाबत अनुकूल असल्यास उपमहाव्यवस्थापकांनी हे प्रकरण तपासायचे आहे व अपराध गंभीर स्वरूपाचा असल्यास बदलीबाबत निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे दोषी नसलेल्यांना दिलासा मिळेल. या वृत्ताला नागपूरच्या विभाग नियंत्रक कार्यालयाने दुजोरा दिला आहे.

पैसे घेऊन तिकीट न दिल्यास मात्र बदली..

पैसे घेऊन तिकीट न दिल्यास वाहकाला तिकीट मूल्याच्या तुलनेत १०० च्या पट दंड केला जातो. दुसऱ्यांदा असे केल्यास तिकीट मूल्याच्या ३०० पट दंड केला जातो. तिसऱ्यांदा असे केल्यास ५०० पट दंडासह अन्य आगारात बदली केली जाते. त्यानंतरही असे कृत्य केल्यास इतर जिल्ह्यात बदली केली जाते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बदलीसाठी समिती..

एसटी महामंडळाच्या भरारी पथकाला वाहकाने प्रवाशाकडून प्रवास भाडे वसूल न करता तिकीट न दिल्याचे पहिले प्रकरण आढळल्यास वाहकाला तिकीट भाडय़ाच्या ५० पट दंड केला जातो. दुसऱ्यांदा या वाहकाला पकडल्यास १०० पट दंड केला जातो. तिसऱ्यांदा आढळल्यास १५० पट दंड करून वाहकाची अन्य आगारात बदली केली जात होती. त्यानंतर आढळल्यास इतर जिल्ह्यात बदली केली जात होती. परंतु आता दंड होणार असला तरी बदलीचा निर्णय समितीकडून चौकशीनंतरच होणार आहे.