गोंदिया : गोंदिया-कोहमारा राष्ट्रीय महामार्गावर मुंडीपार ते मुरदोली दरम्यान टिप्परच्या धडकेत दुचाकीस्वार दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार १९ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या सुमारास घडली. दिनेश अमरलाल पंधरे (३२) व देवेंद्र नेथूलाल उईके (३५) दोघेही राहणार बाघाटोला पोस्ट सावरी खुर्द जि. बालाघाट अशी मृतांची नावे आहे.
प्राप्त माहितीनुसार दोन्ही मृतक हे नागपूर येथे रोजगारासाठी राहत होते. दरम्यान, दिवाळी निमित्त रविवारी पहाटे ते दुचाकी क्रमांक एम पी ५० झेड सी ६७९४ ने स्वगावी जाण्यासाठी निघाले असता सकाळी सात ते आठ वाजताच्या सुमारास नागपूर कडून गोंदियाकडे येत असतांना विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्पर क्र. एम एच.४० बीएल ७८७३ च्या चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन भरधाव वेगात चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक एवढी भीषण होती की या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. पोलिसांनी टिप्पर ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलिस करीत आहेत. गोंदिया कोहमारा मार्गावर अवैध वाळूची वाहतूक नेहमीच होत असल्यामुळे या मार्गावर असे अपघात नेहमीच घडत असतात
दोन टिप्परची धडक; चालक जागीच ठार, एक गंभीर
गोंदिया शहर जवळील नागरा ते मोहरानटोली मार्गावरील घटना गोंदिया भरधाव टिप्परने समोरून येणाऱ्या टिप्परला धडक दिल्याने झालेल्या अपघातात चालक ठार तर एकजण जखमी झाला. ग्रामीण पोलिस ठाण्यांतर्गत नागरा ते मोहरानटोली मार्गावर शनिवार १८ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी ७:३० वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. नितेश सुनील वैद्य (३४, रा. खैरलांजी रोड, गौतमबुद्ध वॉर्ड, तिरोडा) असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे, तर दुसरा टिप्पर चालक वीरेंद्र चैनलाल नागपुरे (३५, रा. सहेसपूर, ता. गोंदिया) हा जखमी आहे. चालक नितेश वैद्य हा टिप्पर क्रमांक एमएच ३४-एजे २७०९ ला घेऊन बालाघाटकडून गोंदियाकडे येत होता, तर वीरेंद्र नागपुरे हा गोंदिया कडून बालाघाटकडे टिप्पर क्रमांक एमएच ३५० एजे ०२६३ घेऊन जात होता.
नागरा ते मोहरानटोली मार्गावर दोन्ही टिप्पर समोरासमोर आले आणि नितेश वैद्य याने भरधाव वेगात असलेल्या वीरेंद्रच्या टिप्परला धडक दिली. यात नितेश वैद्य जागीच ठार झाला, तर वीरेंद्र जखमी झाला. पोलिसांनी जखमी वीरेंद्र नागपुरे याला रुग्णालयात हलविले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पोलिस निरीक्षक सिंगनजुळे यांच्या नेतृत्वाखाली तपास पोलिस हवालदार बहेकार करीत आहेत.