नागपूर/भंडारा : राज्यातील अनेक भागांत गुरुवारी अवकाळी पावसाने हजेरी लावली. विदर्भातील भंडारा जिल्ह्यात वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या पावसाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत आंबा आणि काजूचे नुकसान झाले.

विदर्भात गेल्या दोन दिवसांपासून वादळी पावसाने हजेरी लावली. गुरुवारी पुन्हा पहाटेपासून विजांच्या कडकडाटासह नागपूर, भंडारा जिल्ह्यात पाऊस झाला. भंडारा जिल्ह्यात पावसाची तीव्रता अधिक होती. तुमसर तालुक्यातील पाथरी येथे दुपारच्या सुमारास शेतावर काम करीत असताना वीज पडून दोघांचा मृत्यू झाला. मनीषा भारत पुष्पतोडे (२५) आणि प्रमोद नागपुरे (४५) अशी मृतांची नावे असून दोघेही पाथरी येथील रहिवासी आहेत.

अवकाळी पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातील चार हजार हेक्टर क्षेत्रावरील रब्बी पिकांचे आणि फळबागांचे नुकसान झाले. नागपूर येथेही कळमना बाजारात धान्य, मिरची पावसात ओले झाल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोल्हापूर जिल्ह्यात वादळी वारा, विजेच्या कडकडाटात पावसाने झोडपून काढले. हातकणंगले, कागल, आजरा, करवीर तालुक्यातील काही भागांत जोरदार सरी कोसळल्या.