‘करोना, स्वाईन फ्लू’नंतर नागपूर विभागात आता ‘स्क्रब टायफस’नेही डोके वर काढणे सुरू केले आहे. येथील विविध रुग्णालयांत या आजाराचे आणखी दोन बळी गेल्यामुळे या आजाराची मृत्यूसंख्या पाचवर पोहचली आहे. परंतु, आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे अद्यापही शून्य रुग्णांची नोंद असल्याने या आजाराच्या नोंदीत या विभागाला रस नाही काय, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा >>> गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई पोलिसांचा सर्वत्र चोख बंदोबस्त

नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) १ सप्टेंबरला ‘स्क्रब टायफस’चा एक मृत्यू नोंदवण्यात आला होता. त्यापूर्वी नागपूर ग्रामीण भागातील एका रुग्णाचा या आजाराने खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्यानंतर आता मेडिकल रुग्णालयात या आजाराचे आणखी दोन मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या आजाराचे चार मृत्यू झाल्यावरही नागपुरातील आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे अद्याप एकाही या आजाराच्या रुग्णाची नोंद झाली नाही.

हेही वाचा >>> नवी मुंबई : बाप्पा निघाले गावाला….चैन पडेना आम्हाला…

दरम्यान, या कार्यालयातील अधिकाऱ्यांना विचारणा केली असता नागपूर विभागातील नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, वर्धा जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना पत्र लिहून तातडीने या आजाराची माहिती कळवण्याची सूचना केल्याचा दावा केला जातो. अद्याप एकाही जिल्ह्याची माहिती आली नसल्याने त्यांच्याकडे शुन्य मृत्यूची नोंद असल्याचा आरोग्य उपसंचालक कार्यालयाला दावा आहे. त्यामुळे या विभागाकडून या आजाराचे किती मृत्यू झाल्यावर नोंदीची प्रक्रिया सुरू होणार? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

दरम्यान, या आजाराच्या सुरुवातीला दगावलेल्या दोन रुग्णांमध्ये ४९ वर्षीय आणि ५२ वर्षीय अशा दोन्ही पुरुषांचा समावेश आहे. त्यातील ४९ वर्षीय रुग्णाचा महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला होता. तर गेल्या दोन महिन्यात नागपूर ग्रामीणला या आजाराचे एकूण ४, चंद्रपूर जिल्ह्यात १, गोंदिया जिल्ह्यात २ असे ७ रुग्ण आढळले. त्यापैकी गोंदिया जिल्ह्यातील एक रुग्ण हा मध्यप्रदेशातील आहे. तर मेडिकलमध्ये आता या आजाराचे रुग्ण वाढत आहे. येथे सुमारे सात ते आठहून अधिक रुग्णांची नोंद झाली आहे.