नागपूर : क्रिकेटमधील परफॉर्मन्स अ‍ॅनालिस्ट ही भूमिका आजच्या आधुनिक खेळातील अत्यंत महत्त्वाची आणि रणनीतिक बनली आहे. या पदावरील व्यक्ती खेळाडूंच्या कामगिरीचे सखोल विश्लेषण करून संघाला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत करते.

सामन्यांतील प्रत्येक चेंडू, फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे व्हिडिओ व आकडेवारीच्या माध्यमातून विश्लेषण केले जाते. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे खेळाडूंच्या ताकदी-उणिवा शोधल्या जातात आणि प्रशिक्षणातील सुधारणा सुचवली जाते.

प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाचे पॅटर्न, गोलंदाजांचे वेग, फलंदाजांचे शॉट्स, आणि परिस्थितीनुसार त्यांची प्रतिक्रिया यांचे विश्लेषण करून रणनीती आखली जाते. त्यामुळे परफॉर्मन्स अ‍ॅनालिस्ट हा केवळ सांख्यिकीय तज्ज्ञ नसून, तो संघाचा रणनीतीकार आणि डेटा-आधारित मार्गदर्शक असतो, जो आधुनिक क्रिकेटला अधिक वैज्ञानिक आणि स्पर्धात्मक बनवतो.

भारतीय महिला संघाने अलिकडेच दक्षिण अफ्रिका संघाचा पराभव करत विश्वविजेतेपद मिळविले आणि इतिहास रचला. या ऐतिहासिक कामगिरीत त्यांना मदत केली ते विदर्भातील अनिरुद्ध देशपांडे यांनी. विश्वविजेत्या भारतीय महिला क्रिकेट संघाला ‘टेक्निकल व टॅक्टिकल’ साथ देण्यासोबतच काटेकोर नियोजनाची जबाबदारी अमरावतीच्या अनिरुद्ध देशपांडे यांनी सांभाळली होती. नियोजन, डावपेच, मेहनत व आत्मविश्वास तसेच प्रचंड सांधिक भावनेच्या जोरावर महिला क्रिकेटपटूंनी हा इतिहास रचला.

कोण आहेत देशपांडे?

अनिरुद्ध देशपांडे हे स्वतः उत्तम खेळाडू आहेत. अमरावतीच्या हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाच्या मैदानावर त्यांनी आपल्या करिअरला सुरवात केली होती. विदर्भाच्या १९ वर्षांखालील संघाने विजेतेपद पटकाविले, त्यावेळी अनिरुद्ध देशपांडे हे विदर्भाच्या संघात होते. १४ व १६ च्या संघाचे कर्णधारपदसुद्धा त्यांनी भूषविले आहे. क्रिकेटमध्ये करिअर करीत असतानाच त्यांनी याच खेळातील वेगळी वाट निवडली व तांत्रिक बाजू सांभाळली.

अनेक पातळ्यांवर काम केल्याने प्रचंड अनुभव तसेच अभ्यास पाठीशी असल्याने महिला क्रिकेट संघाच्या परफॉर्मन्स अॅनालिस्टची जबाबदारी त्यांनी अतिशय सक्षमपणे सांभाळली. कोणत्या मैदानाची खेळपट्टी कशी आहे, कोणत्या संघाशी आपला सामना होऊ शकतो, त्यावेळचे संभाव्य वातावरण, प्रतिस्पर्धी खेळाडूंच्या कमकुवत बाजू, अशा सर्वच बाजूंनी अभ्यास करण्यात आला.

परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्यात आली तसेच मेजर बेसिक प्लॅन तयार केल्यावर व्हा मीटिंग घेऊन त्यात आवश्यकता वाटल्यास बदल करण्यात येत होते. तीन सामने पराभूत झालो असलो तरी मनोबल कायम होते. न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात मूव्हमेंट मिळाली अन् प्रचंड आत्मविश्वासाने आपल्या संघाच्या खेळाडूंनी झेप घेतली. विश्वकरंडक जिंकल्यावरच भारतीयांची स्वप्नपूर्ती झाली, असे अनिरुद्ध देशपांडे यांनी सांगितले.