नागपूर : उपराजधानीसह संपूर्ण विदर्भात मुसळधार पावसाचे तांडव कायम आहे. मंगळवारी दुपारी शहरात गारांच्या माऱ्यासह पाऊस झाला. त्यात एक जीर्ण घर कोसळून एकजण मृत्युमुखी पडला. त्यानंतर मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातदेखील मुसळधार पावसामुळे रस्ते जलमय झाले. तर काही जिल्ह्यात वस्त्यांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
हवामान खात्याने दिलेला मुसळधार पावसाचा इशारा कायम असून अवकाळी पावसामुळे अनेक शहरे जलमय झाली आहेत. गेल्या आठवड्यात बुलढाणा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. तर काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला होता. मंगळवारी रात्रीपासून पुन्हा एकदा तीच स्थिती निर्माण झाली आहे. मंगळवारी नागपूर शहरातील रेल्वे स्थानकालादेखील गळती लागली होती. रेल्वेचे छत गळत असल्याने प्रवाश्यांची चांगलीच तारांबळ उडाली. तर कळमना बाजारात मोठ्या प्रमाणात मिरची ओली झाल्याने नुकसान झाले.
हेही वाचा – अमरावती : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे साहित्य आता एका ‘क्लिक’वर
वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात काढून ठेवलेला कांदा पावसामुळे सडायला लागला आहे. सेलू तालुक्यात नद्या दुथडी भरून वाहत आहे. चंद्रपूर शहरात रस्ते पावसाने तुंबले होते. काही ठिकाणी अजूनही पाणी साचले आहे. ग्रामीण भागात पावसाचा जोर मात्र कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यातदेखील पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे.
हेही वाचा – चंद्रपूर: ताडोबाचे मुख्य आकर्षण काळा बिबट्या; पर्यटकांना मनसोक्त दर्शन
विदर्भातील सर्वच जिल्ह्यात ही स्थिती कायम असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. आज दिवसभर हा पाऊस कायम राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे.