लोकसत्ता टीम

वाशीम : लोकसभेची निवडणूक लागल्याने कधीही न दिसणारे पुढारी आता गाव खेड्यात प्रचार करताना दिसून येत आहेत. वाशीम जिल्ह्यातील रिसोड मालेगाव विधानसभा मतदार संघ अकोला लोकसभेत येतो. मात्र, या लोकसभा मतदार संघाचे खासदार संजय धोत्रे मतदार संघात फारसे दिसून न आल्याने त्यांचे पुत्र व भाजपचे उमेदवार अनुप धोत्रे यांना प्रचार करताना अनेकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.

अकोला लोकसभेचे खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र व भाजप लोकसभेचे उमेदवार अनुप धोत्रे यांना उमेदवारी जाहीर होताच त्यांनी रिसोड व मालेगाव तालुक्यात प्रचार मोहीम हाती घेतली आहे. त्यांचे वडील या भागाचे खासदार आहेत. तसेच ते केंद्रात मंत्री देखील होते.

आणखी वाचा-विजय वडेट्टीवार यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश! धर्मरावबाबा आत्राम यांच्या दाव्याने खळबळ

मात्र, त्यांनी कायमच रिसोड व मालेगाव तालुक्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जनतेतून होत आहे. निधी वाटप करताना देखील जवळील पदाधिकारी व ठराविक गावांनाचा झुकते माप दिल्याची चर्चा मतदार संघात आहे. मालेगाव तालुक्यात कुठलेच नवीन उद्योग आले नाही. अमानी येथे औद्योगिक वसाहत नावापुरतीच असून केवळ दोन उद्योग मागील पंचवीस वर्षात उभे राहू शकले. रस्ते आणि सिंचनासह अनेक प्रश्न रिसोड व मालेगाव तालुक्यात कायम आहेत.

यावेळेस भाजपकडून खासदार संजय धोत्रे यांचे पुत्र अनुप धोत्रे यांना भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर त्यांना रिसोड व मालेगाव तालुक्यातील जनतेची आठवण येत असल्याची खदखद नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे. अनुप धोत्रे यांचे प्रचार कार्यालय मालेगाव येथे सुरु करण्यात आले असून भाजपचे पदाधिकारी भर उन्हात गावन, गाव पिंजून काढत आहेत. मात्र खासदार संजय धोत्रे यांची अनुपस्थित व मतदार संघाकडे केलेल्या दुर्लक्षामुळे त्याचे पुत्र अनुप धोत्रे यांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

आणखी वाचा-सरसंघचालक डॉ. मोहन भागवत मेहकरात! स्वयंसेवकांना कानमंत्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मालेगाव तालुक्यातील सुकांडा येथे अनुप धोत्रे प्रचारासाठी गेले असता त्यांना नागरिकांनी दहा वर्षात काय केले ? तुमचे वडील खासदार असताना आमचे गाव दिसले नाही का? आता तुम्ही निधी दिल्याचे सांगता त्यामुळे तुम्हाला आम्ही मतदान का करावे ? असा जाब ग्रामस्थ विचारू लागले असून तशी चित्राफित सध्या सोशल मीडियावर चांगलीच प्रसारित होत आहे.