वर्धा : सरकार आम्ही चालवितो, तुमचे काम अंमलबजावणी करण्याचे. त्यात हयगय कराल तर आम्ही बदनाम होणार. मग तुमचे काय ? असा सवाल जर होत असेल तर मग प्रशासनाच्या भीतीला पारावार राहणार नाही. हेच चित्र जिल्हा प्रशासनात आज दिसत असून सर्व शासकीय फाईल्स ठप्प पडल्या असल्याची चर्चा आहे. आज ताजे चित्र असे की सर्व अधिकारी प्रथमच थंब वेळेवर करीत असल्याचे जिल्हा प्रसासनाचा लिपिक सांगतो.

नेमके झाले काय ? तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेली बैठक. त्यास सात दिवस लोटतात. त्या बैठकीत मंत्री बावनकुळे यांनी सगळ्यांना धारेवार धरले. तुझे किती एजेंट ते सांगू कां, असा थेट सवाल झाला. अधिकारी गांगरला. गयावया झाली. पण महसूल मंत्र्यांनी त्यांच्या खात्याचा अतिरिक्त प्रभार सांभाळणाऱ्या शासनाच्या प्रधान सचिवास थेट फोन लावला. या अधिकाऱ्यांस निलंबित करा, असे आदेश दिले. तसेच नागपूर विभागीय आयुक्तांना फोन लावत काही तहसीलदार यांची वेतनवाढ थांबविण्याची सूचना केली. जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांची प्रशंसा करतांनाचा या अश्या अधिकाऱ्यांपासून सावध राहण्याचा सल्ला पण दिला.

एक दोन प्रकरणात काही अधिकाऱ्यांवर चांगलीच बेतणार होती. पण एका आमदाराने, सध्या मेमोच द्या, कठोर कारवाई पुढे बघता येईल, अशी शिफारस केल्याने अधिकारी वाचला. उपस्थित सर्व आठही तहसीलदार यांना धारेवार धरण्यात आले. त्यांच्या मध्यंस्थिची यादीच हाती असल्याचे सांगण्यात आल्याने तहसीलदार घामाघूम. पण यांना सुधारणा करण्याची एक संधी दिली पाहिजे, अशी विनंती एका लोकप्रतिनिधिने केली तेव्हा बावनकुळे यांनी पुढच्या बैठकीत सुधारणा कामाबाबत सुधारणा दिसेल, अशी अपेक्षा व्यक्त करीत दिलासा दिला. आज आठ दिवस होत आहे पण एकही वरिष्ठ भीतीतून बाहेर निघाल्याचे दिसत नसल्याचे एक भाजप नेता सांगतो. खरे तर पत्रकारांनी या भीतीग्रस्त व पुढे काय या चिंतेत असणारा अधिकारी वर्ग बोलता केला पाहिजे, अशीही मल्लिनाथी भाजप नेते करतात.

मंत्री बावनकुळे यांनी दिलेली तंबी व कठोर कारवाई करण्याचा ईशारा याबाबत कुणीही अधिकृत बोलायला तयार नाही. केवळ घडले ते खरे, हाच दुजोरा मिळतो, पण प्रशासन गपगार झाल्याचे दिसते अशी टिपणी येते.

अखेर आमदार सुमित वानखेडे यांनी मंत्री बावनकुळे यांनी घेतलेल्या बैठकीत अधिकारी वर्गाची झाडाझडती घेतली, ही बाब खरी असल्याचे मान्य केले. विचारणा केल्यावर ते म्हणाले की अधिकारी वर्गाच्या उदासीनतेमुळे सरकार बदनाम होणार असेल तर खपवून घेणार नाही. लोकप्रतिनिधी वर्गास ऐकून नं घेण्याची बाब अक्षम्य. यापुढे बदल दिसून नं आल्यास कठोर कारवाई केल्या जाईल, असे बावनकुळे यांनी बजावल्याचे आमदार सुमित वानखेडे यांनी लोकसत्ता सोबत बोलतांना स्पष्ट केले. रात्री सलग चार तास चाललेल्या या मॅरेथॉन बैठकीत बहुतांश अधिकारी वर्गाची भंबेरी उडाली. इशारा मिळालेल्या काहींपैकी सुट्टीवर गेले असून आज जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात बावनकुळे यांनी दिलेल्या तंबीचा भितियुक्त परिणाम दिसून येत असल्याचे स्थानिक भाजप पदाधिकारी बोलत आहे.