वर्धा : वर्ध्याचे खासदार अमर काळे व जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज राजेश भोयर चांगलेच एकमेकांना भिडले आहेत. कोण कुठे बसणार, कोणाचे नाव वर व कोणाचे खाली असा प्रोटोकॉल वाद, निधीची मारामारी आणि खासदार संतप्त, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा खासदारांना टोला, असे या एकमेकांना भिडण्याचे दाखले आहेत. आता काळी दिवाळी कुठे, असा तिढा. खासदार अमर शरद काळे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर २१ तारखेस काळी दिवाळी करीत निषेध व्यक्त करण्याची घोषणा केली होती. हे आंदोलन पालकमंत्री डॉ. भोयर यांच्या घरापूढे करणार, असेही खासदार बोलून चुकले.
पण हे शब्द आता फिरले. खासदार काळे आता स्पष्ट करतात की काळी दिवाळी आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयापूढे २१ तारखेस म्हणजे लक्ष्मीपूजनास होणार. हा बदल का ? असा प्रश्न चर्चेत आला असून त्याचे उत्तर डॉ. भोयर यांना भारी करणारे ठरत आहे. खासदार बोलतात एक पण करतात दुसरेच. प्रसिद्धी घेतली आणि आता पाय मागे घेतला. कारण पोलिसांनी दिलेली तंबी. पालकमंत्री घरापूढे आंदोलन कराल तर खबरदार, असा ईशारा आणि खासदार काळे यांचा निर्णय बदल झाला, अशी जिल्ह्यात चर्चा सूरू झाली. यामुळे काळे घाबरले, अशी बोलवा.
खासदार काळे काय म्हणतात ?
तर लोकसत्ताशी या चर्चेवर प्रथमच बोलतांना खासदार अमर काळे म्हणतात, कुणाला घाबरण्याचे कारणच काय हो, मी तसा नाही. पालकमंत्री घरापुढे निषेध म्हणून काळी दिवाळी करणार हे मी बोललो. पण त्यावर प्रतिक्रिया आली. माझे ज्येष्ठ सहकारी व सल्लागार मला म्हणाले की हे कशाला, आंदोलन करायचे तर थेट सीएमच्या घरासमोर करुना. तुम्ही ज्येष्ठ नेते, कश्याला,,,,,. असा सल्ला मिळाला. म्हणून मी माझा निर्णय चेंज केला. जिल्हाधिकारी कार्यालयापूढे आंदोलन होणार. घाबरून निर्णय बदलला नाही, असे खा. काळे म्हणाले. मी अशा आंदोलनाचा ईशारा दिला पण पोलिसांकडे नियमानुसार जो अर्ज द्यावा लागतो, तो दिलाच नाही. अर्ज दिला असता तर कदाचित विचारणा झाली असती. पण एकाही पोलीस अधिकाऱ्याचा मला या आंदोलनाबाबत फोन नाही. केवळ चर्चा व त्यामुळे तर्क लावण्याचा हा प्रकार, असेही काळे यांनी नमूद केले.
तर पालकमंत्री गोटातून यावर अधिकृत भाष्य नाही. मात्र टीका करणारे पत्रक येते आणि ते छापू नका अशी विनंती पण खासदार कार्यालयाकडून झाली आहे. नेमके या प्रकरणात काय झाले, हे सांगता येत नसल्याचे उत्तर येते. एक तेव्हढेच खरे की खासदार काळे यांनी जिल्हा राजकारणात पालकमंत्री भोयर यांना क्रमांक एकचे राजकीय शत्रू केले आहे.