वर्धा : जगप्रसिद्ध अदानी उद्योगसमुहाच्या अदानी फाउंडेशन अध्यक्ष डॉ. प्रीती गौतम अदानी अखेर कडेकोट बंदोबस्तात सावंगी येथील दत्ता मेघे आयुर्विज्ञान संस्था व अभिमत विद्यापीठात आज पोहचल्या. झेड प्लस सुरक्षा व स्वतःची विदेशी सुरक्षा व्यवस्था त्यांच्या दिमतीस आहे. २४ तासापूर्वी म्हणजे काल सोमवारी त्यांनी विद्यापीठ परिसर तपासला. आज सकाळी ११ वाजता मिसेस अदानी यांचे आगमन झाले.
परिसरात येताच मिसेस अदानी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाद्वारे दिल्या जाणाऱ्या सेवा तपासल्या. सर्व विभागास भेटी देणे सुरू केले. सिद्धार्थ गुप्ता स्मृती कॅन्सर रुग्णालयास त्यांनी भेट दिली आणि त्या थक्क झाल्यात. प्रत्येक रुग्णास मिळणारे उपचार, सेवेतील डॉक्टर, उपचार पद्धती, केमोथेरेपी सुविधा, अद्यावत मशिनरी याबाबत त्यांनी विचारपूस केली. शेवटी त्या म्हणाल्या, अरे वाह हे तर मी शासकीय रुग्णालयात पण सेवेचे असे चित्र पाहले नाही. जगभर आरोग्य सेवा पाहली. पण या मेघे विद्यापीठात सर्व ते उत्तम व आधुनिक दिसून येते.छान वाटले, अशी प्रतिक्रिया.हे हॉस्पिटल नव्हे, हे तर आधार केंद्र, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
या कॅन्सर रुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन भोला हे लोकसत्तासोबत बोलतांना म्हणाले की कर्करोग रुग्णावर होणारे उपचार शासकीय मदतीतून होत असूनही सर्व ती काळजी घेत असल्याची बाब डॉ. प्रीती मॅडम यांना भावली. रुग्णास हे केंद्र जेवण पण पूरवित आहे, ही बाब त्यांना विशेष पसंतीस आल्याचे डॉ. भोला म्हणाले.
अदानी हे नाव माहित नसेल असा एकही भारतीय नसेल. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचंड प्रभाव राखून असणारे हे नाव. अदानी उद्योगसमूह विविध बलाढ्य संस्था आपल्या पंखाखाली घेण्याचे कसब राखून असल्याने त्यांचा दरारा पण मोठाच. तर याच उद्योगसमुहाच्या डॉ. प्रीती गौतम अदानी वर्धेसारख्या छोटया गावात येणार म्हटल्याने भुवया उंचावणारच. त्यात परत मेघे विद्यापीठ हे नाव आल्याने प्रचंड उत्सुकता. मेघे अभिमत विद्यापीठाचा ताबा घेण्यास त्या येत आहेत कां? असाच प्रश्न.
पण सध्या तरी त्यास अधिकृत दुजोरा मिळाला नाही.आज दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा होत आहे. त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. प्रीती अदानी आल्यात.अदानी फॉउंडेशनच्या त्या अध्यक्ष आहेत. वार्षिक १०० दशलक्ष डॉलर्सचा खर्च असून अदानी समुहाच्या सामाजिक कल्याण व विकास विभागाची ती शाखा आहे. डॉ. प्रीती या १९९६ पासून संस्थेचे नेतृत्व करतात. त्या स्वतः डेंटिस्ट असून त्यातील करिअर सोडून त्यांनी समाजसेवेस समर्पित केले. डॉ. प्रीती यांच्या नेतृत्वात फाउंडेशन शिक्षण, आरोग्य आणि पोषण, शाश्वत उपजीविका, हवामान कृती व सामुदायिक विकास या पाच क्षेत्रात कार्यरत आहेत. संयुक्त राष्ट्र संघाच्या उद्दिष्टांशी सुसंगत हे कार्यक्रम असल्याचा दावा फाउंडेशन करते.
अदानी व मेघे यांच्यातील कथित व्यवहाराबाबत दोन वर्षांपासून चांगलीच चर्चा होत आहे. अदानी समूह सावंगी येथील मेघे वैद्यकीय संस्था ताब्यात घेणार असल्याचे सातत्याने बोलल्या जाते. मात्र तसे काहीच होणार नसल्याचा निर्वाळा संस्थेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला होता. अदानी समूहाने उत्सुकता दाखविली पण त्यास नकार दिल्याचे सांगितल्या गेले. याच कथित चर्चेच्या ओघात डॉ. प्रीती यांनी सावंगी येथे सहज भेट देण्याची ईच्छा दर्शविली. तेव्हा, असे सहज येण्यापेक्षा कार्यक्रमास या अशी विनंती मेघे समूहाने केल्याचे समजले. म्हणून आता विद्यापीठाचा दीक्षांत समारोहचे औचित्य साधून त्यांना पाहुणे म्हणून बोलावण्यात आले.