लोकसत्ता टीम

चंद्रपूर : या जिल्ह्यात बंदुका, काडतुसे, गावठी बनावटी अग्निशस्त्र, तलवार तथा इतर शस्त्र सर्रास मिळत आहे. पोलिस विभागाने मंगळवारी लखमापूर येथे दीपक उमरे व विक्रम जुनघरे या दोघांना अटक करून त्यांच्याकडून गावठी बनावटी अग्निशस्त्र व तलवार जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान छत्तीसगड, मध्यप्रदेश व बिहार या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात बंदुका, काडतुसे व तलवारी येत असल्याची पोलिसांची माहिती आहे.

जुलै महिन्यात तीन गोळीबारीच्या घटना, पेट्रोल बॉम्ब व हत्याकांडानंतर पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी धडक कारवाईला सुरूवात केली आहे. पाच दिवसांपूर्वी युवासेना जिल्हाध्यक्ष विक्रांत सहारे यांच्या घरून ४० जिवंत काडतूसं, तलवार व अग्निशस्त्र जप्त केले. तर मंगळवार ६ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लखमापूर येथे कोम्बिंग ऑपरेशन राबवून एक गावठी बनावटी अग्निशस्त्र, एक जिवंत काडतूस, तसेच एक धारदार लोखंडी तलवार जप्त करून दीपक उमरे, रा. राजुरा ह. मु. लखमापूर व विक्रम जुनघरे, रा. छत्तीसगड कॉलनी, लखमापूर या दोघांना अट केली. दोघांवर रामनगर पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा नोंद करून अटक केली आहे. तीन महिन्यानंतर विधानसभा निवडणूक होऊ घातली आहे. त्यामुळे पोलीस अधिक्षक सुदर्शन यांनी आता अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरूध्द धडक कारवाई सुरू केली आहे. त्याचाच परिणाम आतापर्यंत २२ जणांवर हद्दपारीची कारवाई केली आहे तर येत्या काही महिन्यात आणखी काही जणांवर हद्दपारीची कारवाई केली जाणार आहे.

आणखी वाचा-शिष्यवृत्ती प्रकरणात नऊ महाविद्यालयांना समाज कल्याणचा इशारा

यासंदर्भात पोलीस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांना विचारणा केली असता, शस्त्रे यापूर्वीच म्हणजे २०२१-२२ या कालावधीतच जिल्ह्यात आलेली आहे. ही शस्त्रे लगतच्या छत्तीसगड, मध्यप्रदेश व बिहार या तीन राज्यातून मोठ्या प्रमाणात येत आहे. आम्ही अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांविरूध्द कारवाई सुरू केली आहे. यात कोणालाही सोडले जाणार नाही असेही सुदर्शन् म्हणाले. जिल्ह्यात मोठ्या संख्येने अवैध शस्त्र बाळगणारे आहेत. या सर्वांची माहिती घेवून कारवाई केली जाणार आहे. यापूर्वी बल्लारपूर, राजुरा, माजरी व चंद्रपूर शहरात बंदुका बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

आणखी वाचा-नागपूरकरांचा सवाल? आयुक्त साहेब, ड्रग्स तस्करांची साखळी कधी तुटेल?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या जिल्ह्यात रेती, कोळसा, तंबाखू, गुटखा, देशीविदेशी दारू तस्करी तथा ऑनलाईन क्रिकेट सट्टा आदी अवैध काम करणाऱ्या बहुसंख्यांकडे बंदुका, तलवारी व इतर शस्त्र आहेत. काही तस्करांनी तर गुन्हेगारांच्या टोळ्याच तैनात करून ठेवलेल्या आहेत. या सर्वांना जिल्ह्यातील युवा राजकीय नेत्यांचा आशिर्वाद आहे. रात्रीच्या अंधारात तस्करीची ही सर्व कामे सुरू आहेत. यामध्ये अनेक जण गुंतलेले असून पोलिसांनी अशा गुन्हेगारांना पकडून कारवाई करावी अशीही मागणी होत आहे.