नागपूर : जिजाऊ बँकेकडून १०० कोटींचे कर्ज मिळवून देतो, असे सांगत सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्त सुनिल बोंडे आणि माधव पांढरे पाटील या दोघांनी साडेतीन तीन कोटी रुपयांनी फसवणूक केल्याची तक्रार घनकचरा व्यावसायिक अतूल झोटिंग यांनी सीताबर्डी पोलीसांकडे केली. पोलिसांनी दिड महिन्यांपासू यावर गुन्हा दाखल केला नाही. हे प्रकरण ताजे असतानाच रामटेक येथील आनंद खंते आत्महत्या प्रकरणातही माधव पाटील यांचे नाव आले. तरीही पोलीस दोघांवर गुन्हा दाखल करण्यास कचरत आहेत. मात्र या दोन्ही प्रकरणात पोलीस तडजोडीसाठी जीवाचा आटापीटा करत असल्याने कायदेशीर चौकशी टाळण्यामागचा खरा सुत्रधार कोण हा तपासाचा विषय झाला आहे.
या सगळ्या फसवणूक प्रकरणात हकनाक ज्यांचा जीव गेला, त्या आनंद खंते यांच्या आत्महत्येला अखेर जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित होत आहे. फसवणूक करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे बंधू एका राजकीय पक्षाचे मोठे नेते आहेत. शिवाय हे सगळे प्रकरण पोलीस दलातल्या वरिष्ठांना माहित आहे. तरीही फसवणूक आणि खंते आत्महत्येत नाव आलेल्या दोघांवर गुन्हा दाखल का होत नाही, प्रकरण पोलीस ठाण्याच्या बाहेर तडजोडीवर मिटवण्यासाठी पोलीसांकडून इतका आटापीटा का हे कोडे बनले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल होऊ नये आणि कायदेशीर चौकशी टळावी, यामागचा सुत्रधार कोण हा आता तपासाचा विषय आहे.
मुळात सीताबर्डी पोलीसांच्या पायरीपर्यंत जाऊन पोचलेल्या साडेतीन कोटींच्या फसवणूक प्रकारणामागे अनेक कंगोरे आहेत. फसवणूकीची तक्रार करणारे झोटींग यांनी शहरातल्या दोन बँकांची अप्रत्यक्षरित्या फसवणूक केल्याची माहिती मिळत आहे. झोटिंग यांनी बोंडे आणि पाटील यांच्याशी ज्या व्यवहारात साडेतीन कोटींची रक्कम वापरली ती बँकेने घन कचरा व्यवसायासाठी दिलेल्या कर्जातली होती, अशी माहिती मिळत आहे.
झोटींग हे एका ठाणेदारांचे मित्र आहेत. त्यामुळे ठाणेदारही स्वतः मध्यस्थी करत तडजोडीसाठी आटापीटा करत आहेत. यातून एका बाजूने ते सहकाऱ्याला वाचवत आहेत तर दुसऱ्या बाजूने मित्राचा पैसा तडजोडीतून मिळावा, यासाठी प्रयत्न खटाटोप करत आहेत. या सगळ्या घडमोडीत आनंद खंते आत्महत्या प्रकरणातही माधव पांढरे पाटील यांचे नाव आले आहे. तरीही त्याच्यावर ना खंते आत्महत्या प्रकरणात गुन्हा दाखल आहे, ना झोटींग फसवणूक प्रकरणात. त्यामुळे पोलीसांच्या कारभावरवही प्रश्नचिन्ह लागत आहे. पोलीस अधिकारी नेमके कोणाला वाचवत आहेत, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.
बोंडे यांच्याकडून प्रतिसाद नाहीया संदर्भात बाजू जाणून घेण्यासाठी सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त सुनिल बोंडे यांच्याशी भ्रमणदूरध्वनीवर तीन वेळा संपर्क साधला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
”कर्ज प्रकरणात मूळ उद्देषाला डावलून जर कर्जाची रक्कम इतरत्र वापरली तर ती फसवणूकच ठरते. तशी कारवाई करण्याचा अधिकार हा कर्ज पुरवठा करणाऱ्या बँकेच्या शाखेला असतो. तशी तक्रार मुख्यालयाकडे आली तर त्यानंतर दक्षता विभाग कारवाई करते. हे प्रकरण बँकेच्या शाखेशी निगडीत असेल तर त्याची माहिती घेतली जाईल. ”- मनिष दोडके, उप व्यवस्थापक, दक्षता विभाग, आय. डी. बी. आय. बँक
”कर्जापोटी बँकेच्या शाखेने पुरवलेली रक्कम इतरत्र वापरली असेल आणि त्याचा पोलीस तक्रारीत उल्लेख असेल तरच मुख्यालयाकडून कायदेशीर प्रक्रिया होईल. मात्र खातेदाराच्या व्यवहाराशी निगडीत, अशी माहिती तुर्तास तरी सार्वजनिक केली जाऊ शकत नाही. ”– चेतन भिवगडे, विधी अधिकारी, कॅनरा बँक
”बँकेने व्यवसायासाठी पुरवलेल्या कर्जाची रक्कम कुठे वापरली, कोणाला दिली हे सांगण्यास मी बांधील नाही. हा माझा व्यक्तिगत व्यवहार असल्याने या बाबत कोणतीही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. ”- अतूल झोटींग, तक्रारदार